उंटवाडीतील जगतापनगर, कर्मयोगीनगर, तिडकेनगर आणि दोंदे पुलाच्या एका बाजूला गेल्या ५ जून रोजी जागतिक पर्यावरणदिनी, शिवसेना आणि सत्कार्य फाउंडेशनने मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड केली. या वृक्षांना वेळोवेळी पाणी देऊन ते जगविण्यासाठीही ते प्रयत्न करीत आहेत. यानंतर भाजपने वटपौर्णिमेला (२४ जून) रोजी नंदिनी नदीकाठी मोठा गाजावाजा करून वृक्षारोपण केले. त्याची होर्डिंगबाजीही केली. पावसाच्या पाण्याने वृक्ष आपोआप जगतील, त्याकडे लक्ष देण्याची गरज नाही, अशी भावना भाजप कार्यकर्त्यांची असावी. पावसाने ओढ दिल्याने मात्र हे वृक्ष पुरते सुकले आहेत. त्यांना पाण्याची व्यवस्था करून ते जगविण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी तिडकेनगर, कर्मयोगीनगर, हेडगेवारनगरच्या रहिवाशांनी केली. त्यानुसार शिवसेना महिला आघाडीच्या चारूशिला गायकवाड, सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड, शाखाप्रमुख बाळासाहेब मिंधे यांनी महापालिकेकडे पाठपुरावा केला. सोमवारी परिसरासह दोंदे पुलाजवळ नंदिनी नदीच्या एका काठावर भाजपने लावलेल्या झाडांना महापालिकेच्या टँकरद्वारे पाणी दिले. भाजपने लावलेल्या रोपट्याला शिवसेनेने जीवदान दिल्याची एकच चर्चा या परिसरात रंगली आहे.
(फोटो ०६ पाणी)