नाशिक : स्त्री रुग्णालयाला जागा कोणती द्यायची हा अधिकार महासभेचा असून, त्याबाबत कुठलीही चर्चा न करता मागील दाराने मंजुरी देण्यात आलेली आहे. स्त्री रुग्णालय व्हायलाच हवे परंतु, ते कुठे व्हावे यासाठी मुख्यमंत्री अथवा पालकमंत्र्यांच्या दरबारात नव्हे तर महासभेत चर्चा करण्याची मागणी शिवसेनेचे महानगरप्रमुख व मनपातील विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते यांनी पत्रकारांशी बोलताना केली आहे. भाजपा आमदार प्रा. देवयानी फरांदे आणि भाजपाचेच पदाधिकारी व माजी आमदार वसंत गिते यांच्यात शंभर खाटांच्या स्त्री रुग्णालयाला देण्यात येणाºया जागेवरून वाद पेटला आहे. गिते पिता-पुत्रांनी मुख्यमंत्र्यांसह पालकमंत्र्यांचा निर्णय अमान्य करत थेट पक्षाविरुद्धच दंड थोपटले असताना शिवसेनेनेही या वादात उडी घेत भाजपाला घेरण्याची संधी घेतली आहे. विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते यांनी याबाबत पत्रकारांशी बोलताना सांगितले, सदर रुग्णालयाची जागा निश्चित करताना भाभानगरच्या स्थानिक नागरिकांना विश्वासात घेतलेले नाही. दोन पदाधिकाºयांमध्ये सुरू असलेला वाद भाजपाने त्यांच्या वसंतस्मृती कार्यालयात बसून सोडवावा, विनाकारण त्यासाठी महापालिका व नाशिककरांना वेठीस धरू नये. मुळात सदरचा प्रस्ताव हा महासभेत चर्चेला आणण्याची आवश्यकता होती. परंतु, मागल्या दाराने सारेच सोपस्कार पाडण्याची सवय जडलेल्या भाजपाने परस्पर त्याला मंजुरी दिली. महासभेचे अधिकार सत्ताधाºयांनी मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांना दिले आहेत काय, असा सवाल करत बोरस्ते यांनी स्त्री रुग्णालयाच्या जागेचा सुरू असलेला फुटबॉल खपवून घेतला जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. ज्याठिकाणी रुग्णालयाचे आरक्षण आहे तेथेच ते झाले पाहिजे. त्याबाबत महासभेत चर्चा व्हायला हवी. मात्र, परस्पर ठराव करून ते पाठविले जात असल्याबद्दलही बोरस्ते यांनी नाराजी व्यक्त केली. येत्या महासभेत सदरचा प्रस्ताव आणून त्यावर चर्चा करावी अन्यथा मतदान घेण्यात यावे, अशी मागणी बोरस्ते यांनी केली. नागरिकांची आज बैठक भाभानगर येथील जॉगिंग ट्रॅक व गायकवाड सभागृहाच्या जागेत उभारण्यात येणाºया स्त्री रुग्णालयास विरोध करण्यासाठी परिसरातील नागरिकांनी भाभानगर जॉगिंग ट्रॅक बचाव समिती स्थापन केली असून, गुरुवारी (दि.१५) प्रभाग क्रमांक १५ मधील नागरिकांची बैठक सायंकाळी ५.३० वाजता जॉगिंग ट्रॅकवर बोलाविण्यात आली आहे.
स्त्री रुग्णालयाच्या वादात शिवसेनेची उडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 01, 2017 11:34 PM