नाशिकरोड विभागातील प्रभाग वीस उच्चभ्रू व मध्यमवर्गीय लोकवस्ती असलेला प्रभाग असून यावर पूर्णपणे भाजपाचे वर्चस्व आहे. अर्थात असे असले तरी भाजपातील बेबनाव वेळोवेळी उघड झाला आहे. त्यातच डॉ. सीमा ताजणे पुन्हा स्वगृही म्हणजेच शिवसेनेत परतण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे यंदा निवडणुकीसाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि मनसे यांनी भाजपला टक्कर देण्यासाठी तयारी केली आहे.
नाशिकरोड विभागातील नवले कॉलनी, पोलीस लाईन, आशानगर, कलानगर, बेला डिसूजा रोड, सानेगुरुजीनगर, गंधर्वनगरी, मोटवानीरोड, रामनगर, शिखरेवाडी, आशर इस्टेट, मनोहर गार्डन, लोणकर मळा, पाटोळे मळा, पंजाब कॉलनी, डावखरवाडी, गायखे कॉलनी, जेतवन नगर, तुळजापार्क, धोंगडे नगर, गायकवाड मळा असा प्रभाग वीसमधील परिसर आहे. सध्या भाजपचे संभाजी मोरुस्कर, शिक्षण मंडळ सभापती संगीता गायकवाड, डॉ. सीमा ताजणे, अंबादास पगारे हे प्रतिनिधित्व करत आहेत. मोरुस्कर हे सलग तिसऱ्यांदा व संगीता गायकवाड, सीमा ताजणे दुसऱ्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आल्या आहेत. यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना यांनी देखील विजय मिळवला होता;मात्र सध्या पूर्णपणे भाजपाचे प्रभागावर वर्चस्व असले तरी पक्षातील वाद सर्वश्रुत आहेत. मोरुस्कर यांना वाचनालयाच्या प्रकरणातून स्वपक्षीयांनीच अडचणीत आणले होते. तर डॉ. सीमा ताजणे यांनी प्रभाग समिती सभापतीच्या निवडणुकीत दांडी मारल्याने सेनेने बाजी मारल्याची घटना याच वर्षीची आहे. भाजपतील आजी माजी आमदारांची या प्रभागातील राजकारणाला देखील झळ बसली आहे.
दरम्यान, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व मनसे यांनी निवडणुकीच्या निमित्ताने कंबर कसण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेसकडे उमेदवाराची वानवा आहे. गेल्या निवडणुकीत रिपाइं आठवले गटाने याच प्रभागात एक जागा मागितली होती; मात्र रिपाइंला जागा न सोडण्यात आल्याने भाजपा, रिपाइं ऐनवेळी तोडल्याचा दावा रिपाइंच्या पदाधिकाऱ्यांनी केला होता.
सध्या भाजपचा प्रभाव असला तरी त्यांच्यातील वाद विरोधकांच्या पथ्यावर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याच सेना, राष्ट्रवादी आणि मनसेमुळे भाजपाला मोठे आव्हान होण्याची शक्यता आहे.