नाशिक : शिवसेनेचे पदाधिकारी निलेश उर्फ बाळा कोकणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी एमजीरोडवरील यशवंत व्यायामशाळेजवळ रात्री वाजेच्या सुमारास हल्ला केला. त्यांच्या डोक्यावर धारधार शस्त्राने वार करण्यात आल्याने दुखापत झाली. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले.
सोमवारी (दि.18) रात्री साडे दहा-पावणे अकरा वाजेच्या सुमारास बाळा कोकणे हे त्यांच्या दुचाकीने एमजीरोडवरून जात होते. यावेळी चार अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर पाठीमागून धारधार व टणक वस्तूने प्रहार केला. यामुळे कोकणे रक्तबंबाळ झाले. अचानकपणे झालेल्या या हल्ल्याने ते घाबरून गेले. आजूबाजूच्या लोकांच्या मदतीने त्यांना सरकारवाडा पोलीस ठाण्याजवळील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर औषधोपचार सुरू आहे.
हल्ल्यानंतर हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच भद्रकाली, सरकारवाडा पोलीस ठाण्यांचे गस्ती पथके घटनास्थळी दाखल झाली. फरार अज्ञात हल्लेखोरांचा पोलीस रात्री उशिरापर्यंत शोध घेत होते. हल्ला नेमका कोणी व का केला? हे उशिरापर्यंत समजू शकले नाही. सुदैवाने या हल्ल्यात कोकणे बचावले. कोकणे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले ते काही प्रमाणात जखमी झाले असून प्रकृती स्थिर आहे.
हल्लेखोरांचा पोलीस शोध घेत असल्याचे भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक दत्ता पवार यांनी सांगितले. प्राथमिक माहितीनुसार हल्लेखोर हे दोन ते चार असण्याची श्यक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. सध्या राज्यात शिवसेनेचे दोन वेगवेगळे गट पहावयास मिळत असून बंडखोरीनंतर राजकिय वातावरण ढवळून निघाले आहे. यामुळे या प्राणघातक हल्ल्याच्या घटनेला पोलिसांनी अधिक गंभीरपणे घेतले असून गुन्हे शोध पथक हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.