नाशिक: गेल्या काही दिवसांपासून सत्ताधारी महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार आणि विरोधी पक्ष भाजप यांच्यात अनेकविध मुद्द्यांवरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दुसरीकडे शरद पवार (Sharad Pawar) यांनी एका मराठी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत अनेक गौप्यस्फोट केले. याबाबत शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी बोलताना, लालबहादूर शास्त्री यांच्यानंतर मनमोहन सिंग यांच्याइतका इतका निष्कपट मनाचा पंतप्रधान मी आयुष्यात पाहिला नाही, असे राऊतांनी नमूद केले.
लालबहादूर शास्त्री यांच्यानंतर मनमोहन सिंग यांच्याइतका इतका निष्कपट मनाचा पंतप्रधान मी आयुष्यात पाहिला नाही. त्यांच्या काळात कोणावरही सूडाची कारवाई झाली नाही. ज्यांच्यावर कारवाई होणार होती तेव्हा मनमोहन सिंग यांनी त्यात पुढाकार घेतला, असे संजय राऊत म्हणाले.
पंतप्रधान मोदी मास्क लावत नाही, म्हणून मी पण लावत नाही
निर्बंध आले की पुन्हा एकदा महाराष्ट्राचे अर्थचक्र अडकून पडेल. नोकरी, काम, रोजगार यावर फार मोठे संकट येईल. ते येऊ नये, असे वाटत असेल तर प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे. आपले पंतप्रधान जरी मास्क लावा सांगत असतील तरी स्वत: मास्क लावत नाहीत. त्यामुळे आम्ही पंतप्रधानांचे ऐकतो आणि मास्क लावत नाही. मुख्यमंत्री मास्क लावतात पण मोदी देशाचे नेते असून कुठेही मास्क लावत नाहीत. मोदी मास्क लावत नसल्याने लोकही लावत नाहीत आणि मीही त्यांचे आचरण करतो. त्यामुळे पंतप्रधान मोदींनीही मास्क लावावा आणि नियमांचे पालन करावे, असे खोचक आवाहन संजय राऊत यांनी केले.
अजित पवारांसोबत सगळे आमदार परत आले
भाजपसोबत अजित पवारांना शरद पवार यांनीच पाठवले, या चर्चांवर शरद पवार यांनी उत्तर दिले आहे. संजय राऊतांना यासंदर्भात विचारण्यात आले. ज्याअर्थी शरद पवार हे सांगत आहेत, त्याअर्थी ते खरे असायला हवे. कारण त्यावेळी भाजपा सरकार स्थापन करण्यासाठी इतकी उत्तेजित झाली होती की, काहीही करुन त्यांना महाराष्ट्रात सत्ता स्थापन करायची होती. मग याच्याशी बोला, त्याच्याशी बोला, याला फोडा, अजित पवारांना गाठा, आमच्या लोकांना गाठा असा मोठा उपक्रम सुरु होता. आम्ही एकमेकांपासून कोणतीही गोष्ट लपवत नव्हतो. आमच्याकडे गुप्त काही नव्हते. कोण काय बोलते, कुणाला भेटते याबाबत पारदर्शकता होती. याबाबत भाजपाला माहिती नव्हते. त्या पारदर्शकतेमुळे त्यांचे सरकार येऊ शकलं नाही. अजित पवार शपथ घेण्यासाठी गेले त्यातही पारदर्शकता होती. म्हणूनच अजित पवारांसोबत सगळे आमदार परत आले, असे संजय राऊत म्हणाले.