आगामी महापालिका निवडणूक शिवसेेनेने प्रतिष्ठेची केली असून, कोणत्याही परिस्थितीत महापालिकेवर भगवा फडकविण्याचा निर्धार केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून मतदार यादीचे पुनरिक्षण सेनेने करून त्यातील बोगस व दुबार मतदार शोधण्यात आले असून, त्यांच्या मते या बोगस मतदारांच्या आधारावरच भाजपने गेली निवडणुकीत विजय मिळविला. त्यामुळे त्याची आगामी महापालिका निवडणुकीत पुनरावृत्ती टाळण्यासाठी मतदार याद्यांचे शुद्धीकरण करण्यात यावे जेणे करून निवडणुकीत मतदानाच्या दिवशी या बोगस मतदारांवरून मतदान केंद्रात राजकीय वाद होण्याची शक्यता आहे. ते टाळण्यासाठी पोलीस व जिल्हा प्रशासनाने मतदार यादीतून सदरचे नावे वगळावी व कटू प्रसंग टाळावा, असे आवाहनही करण्यात आले आहे. यावेळी पोलिस आयुक्त दीपक पांडेय यांना भेटलेल्या शिष्टमंडळात उपनेते बबनराव घोलप, संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, माजी आमदार वसंत गिते, माजी जिल्हाप्रमुख सुनील बागुल, दत्ता गायकवाड, विनायक पांडे, महापालिका विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, विलास शिंदे आदींचा समावेश होता. दुबार नावांबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल,असे आश्वासन पोलीस आयुक्त पांडे यांनी शिष्टमंडळास दिले.
शिवसेना म्हणते, निवडणुकीत राजकीय वाद होतील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 4:18 AM