Hemant Goadse News: लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला आता अवघे काही तास राहिले आहेत. अशा परिस्थितीत महायुतीच्या सर्व जागांवरील उमेदवार किंवा जागावाटप पूर्ण झालेले दिसत नाही. नाशिकसह अन्य काही जागांवर महायुतीचे घोडे अडलेले दिसत आहे. यातच रामनवमीनिमित्त नाशिकच्या काळाराम मंदिरात श्रीरामांचे दर्शन शिवसेना शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांनी घेतले. यावेळी उमेदवारीची संधी मिळू दे, यश प्राप्त होऊ दे, असे साकडे घातले, अशी माहिती हेमंत गोडसे यांनी दिली.
महायुतीचे जास्तीत जास्त उमेदवारां निवडून यावेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रुपात देशाला सक्षम नेतृत्व लाभले आहे. त्यामुळे देशाची मोठी प्रगती होत आहे. पुन्हा एकदा त्यांचे हात बळकट करण्याची संधी मिळू दे. आपल्यालाही उमेदवारीची संधी मिळू दे आणि विजय प्राप्त होऊ दे. यश मिळू दे, असे साकडे काळाराम मंदिरात दर्शन घेताना घातले, असे हेमंत गोडसे यांनी सांगितले.
नाशिकचे जागावाटप एक ते दोन दिवसांत निश्चित होईल
नाशिकचे जागावाटप एक ते दोन दिवसांत निश्चित होईल. एक सकारात्मक निर्णय होईल. नाशिकची जागा शिवसेनेची आहे. विद्यमान खासदार म्हणून जनसंपर्क ठेवला आहे. गेल्या १० वर्षांत अनेक विकासकामे केली आहेत. संघटनात्मक बांधणी उत्कृष्ट पद्धतीने झाली आहे. म्हणून या ठिकाणी प्रभू रामचंद्राचे धनुष्यबाण निवडून येईल, असा विश्वास हेमंत गोडसे यांनी व्यक्त केला.
दरम्यान, हेमंत गोडसे काळाराम मंदिरात असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ हेही तेथे पोहोचले. यावेळी हेमंत गोडसे यांनी छगन भुजबळ यांची भेट घेतली आणि त्यांचे आशिर्वाद घेतले. यावर बोलतना हेमंत गोडसे यांनी सांगितले की, ज्येष्ठांचे आशिर्वाद घेणे ही मराठी संस्कृती आहे. रामजन्मोत्सवानिमित्त काळाराम मंदिरात आलो असताना योगायोगाने छगन भुजबळ यांची भेट झाली. मराठी संस्कृतीप्रमाणे ज्येष्ठांचे आशिर्वाद मिळावे, म्हणून त्यांच्या पाया पडलो, असे हेमंत गोडसे म्हणाले.