नाशिक : नगरसेवक निधीवरून कॉँग्रेसचे नगरसेवक लक्ष्मण जायभावे आणि आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्यात झालेल्या खडाजंगीनंतर शिवसेनेचे गटनेते अजय बोरस्ते यांनी या साऱ्या प्रकाराला महापौरांना जबाबदार धरले असून, सत्ताधारी मनसेवरही कडक शब्दांत घणाघात केला आहे. ५० लाखांच्या नगरसेवक निधीतून होणाऱ्या कामांबाबत महापौरांनी सभागृहात प्रशासनाला आदेशित केल्यानंतरही नगरसेवकांना प्रशासनाच्या दारात जाऊन भांडावे लागत असेल, तर सभागृहाच्या निर्णयाला काहीच अर्थ उरत नसून महापौरांनी अपयशाची कबुली दिल्यास प्रशासनाकडून काम करून घेण्याची धमक शिवसेनेत असल्याचा इशाराही बोरस्ते यांनी दिला आहे. जायभावे-गेडाम यांच्यात झालेल्या वादावादीनंतर सोशल मीडियावरून आयुक्तांच्या समर्थनार्थ एसएमएस फिरत असताना जायभावे यांच्या पाठीशी मात्र जाहीरपणे खुद्द त्यांच्या कॉँग्रेस पक्षातूनही कुणी पुढे आले नव्हते. परंतु शिवसेनेने याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली असून, गटनेते अजय बोरस्ते यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले, मागील महासभेत महापौरांनी प्रशासनाला ५० लाखांचा नगरसेवक निधी देण्याविषयी आदेशित केले होते. त्यानुसार प्रशासन कार्यवाही करते आहे की नाही, हे पाहण्याची जबाबदारी महापौरांची आहे. एकदा सभागृहात निर्णय झाल्यानंतर प्रशासनाने त्यावर कार्यवाही सुरु केली पाहिजे. नगरसेवकांना त्यासाठी प्रशासनाच्या दारात जाण्याची काही गरज नाही. याउलट महापौरांनीच सर्व नगरसेवकांकडून ५० लाखांच्या निधीत बसणाऱ्या अत्यावश्यक कामांची यादी मागवून ती पूर्णत्वाला नेण्यासाठी प्रशासनाला भाग पाडले पाहिजे. प्रशासन व नगरसेवक यांच्यात संघर्ष निर्माण होण्यास सर्वस्वी महापौर आणि त्यांचा सत्ताधारी पक्ष कारणीभूत असल्याचा आरोपही बोरस्ते यांनी केला. (प्रतिनिधी)
शिवसेनेने केले महापौरांना लक्ष्य
By admin | Published: January 31, 2015 12:56 AM