महापालिकेच्या निवडणूका अवघ्या सहा महिन्यांवर आल्या असून, त्यासंदर्भात शिवसेनेने नियुक्त केलेल्या पाचजणांच्या सु्काणू समितीची बैठक जिल्हा प्रमुख विजय करंजकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीस माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड, माजी आमदार वसंत गीते, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, मनपातील विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते हे सदस्य उपस्थित होते.
महापालिकेत भाजपची सत्ता असूनदेखील अनेक प्रलंबित प्रश्न जैसे थे आहेत. तसेच भाजपने निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांपैकी किती आश्वासने पूर्ण झाली याचा पंचनामा यावेळी करण्याचे ठरविण्यात आले. यावेळी शहरातील अनेक रेंगाळेलेले प्रश्न आणि अन्य काही विकास प्रकल्प नाशिकमध्ये राबविण्यासाठी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला. यात झोपडपट्टीमुक्त शहर करण्यासाठी एसआरए योजना मंजूर करावी, गोदावरी प्रदूषणमुक्तीसाठी रिव्हरफ्रंट डेव्हलमेंट प्रकल्प केईएमच्या धर्तीवर नाशिकमध्ये रुग्णालय बांधणे, साधूग्रामच्या जागेवर प्रदर्शनी केंद्र आणि महापालिकेच्या आरक्षित भूखंडांवर बहुमजली वाहनतळ तयार करण्यासाठी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
इन्फो..
भाजपच्या विरोधात आता आंदोलनदेखील करण्याचे या बैठकीत ठरविण्यात आले आहे. विशेेषत: महागाई आणि इंधन दरवाढीच्या विरोधात पुढील महिन्यात आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटना वाढीसाठी वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत बैठका घेण्याचे आणि नगरसेवकांची कार्यशाळा घेण्याचे ठरवण्यात आले. शिवसेनेच्या नगरसेवकांनी प्रभागात केलेल्या कामाचे ब्रँडिंग करण्यासाठी संबंधितांना सूचित करण्यात येणार आहे.