नाशिक - महापालिकेत प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या शिवसेनेच्या नगरसेवकांचे शिबिर नुकतेच महाबळेश्वरला पार पडले. या शिबिरातील प्रशिक्षणाचे परिणाम आगामी काळात दिसण्याची शक्यता असून शिवसेनेने आपला प्रमुख विरोधक असलेल्या भाजपाविरोधी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. येत्या महासभेत त्याचे प्रत्यंतर येण्याची शक्यता आहे.नाशिक महापालिकेसह सिन्नर, इगतपुरी, भगूर येथील नगरपालिकेतील नगरसेवकांचे दोन दिवशीय प्रशिक्षण शिबिर महाबळेश्वर येथे नुकतेच पार पडले. याठिकाणी नगरसेवकांना सभागृहात कामकाज कशा प्रकारे करावे आणि कोणती आयुधे वापरावीत याबाबत विशेष मार्गदर्शन करण्यात आले. त्यासाठी मुंबई महापालिकेतील नगरसेवकांना निमंत्रित करण्यात आले होते. यावेळी आगामी लोकसभा-विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयारीचे आदेशही पक्षश्रेष्ठींकडून देण्यात आले. त्यानुसार, नाशिक महापालिकेत प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या शिवसेनेकडून यापुढे सत्ताधारी भाजपाविरोधी अधिक आक्रमक भूमिका घेतली जाण्याची शक्यता असून तसे संकेतही महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांनी दिले आहेत. भाजपा हाच शिवसेनेचा क्रमांक एकचा शत्रू असल्याचे आतापर्यंतच्या वाटचालीतून दिसून येत आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजपाला नामोहरम करण्याची आणि त्यांच्याकडून होणा-या गैर कारभाराचा पर्दाफाश करण्याची रणनीती आखली जात असून महासभांमध्ये त्याबाबत शिवसेना नगरसेवकांकडून आक्रमक भूमिका घेतली जाण्याची शक्यता आहे. महापालिकेत आयुक्त म्हणून तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्याने शिवसेनेच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. मात्र, मुंढे यांच्याबाबतही सेनेने ‘वेट अॅण्ड वॉच’ची भूमिका घेतली असून त्यांच्या कामकाजाची पद्धती व कल जाणून घेतल्यानंतरच त्यांच्या पाठिशी राहण्याचे ठरविल्याची चर्चा आहे. भाजपाला त्यांनी घेतलेल्या काही निर्णयांबाबतही कोंडीत पकडण्याची व्यूहरचना आखली जात आहे.भाजपा नगरसेवक थंडदोन महिन्यांपूर्वी महापालिकेतील भाजपा नगरसेवकांचेही रामभाऊ म्हाळगी प्रतिष्ठानमध्ये शिबिर घेण्यात आले होते. शिबिरानंतर झालेल्या पहिल्याच महासभेला भाजपाच्या काही नवख्या नगरसेवकांनी चांगल्या कामगिरीचे दर्शन घडविले होते शिवाय शिवसेनेलाही तोडीस तोड प्रत्युत्तर दिले होते. परंतु, नंतर भाजपा नगरसेवकांमध्ये पुन्हा एकदा शैथिल्य आल्याचे दिसून येत आहे. त्यातच पदाधिका-यांमधील अंतर्गत वादामुळेही भाजपा नगरसेवकांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे.
नाशिक महापालिकेत शिवसेनेची भाजपाविरोधी रणनीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2018 3:43 PM
आक्रमकतेवर भर : महाबळेश्वर शिबिराचे दिसणार परिणाम
ठळक मुद्दे येत्या महासभेत त्याचे प्रत्यंतर येण्याची शक्यताभाजपा हाच शिवसेनेचा क्रमांक एकचा शत्रू असल्याचे आतापर्यंतच्या वाटचालीतून दिसून येत आहे