नाशिक : पंचवटीतील मायको रुग्णालयातील अनागोंदी कारभारामुळे एका महिलेची रिक्षातच प्रसूती झाल्याप्रकरणी दोषींची सखोल चौकशी होऊन कारवाई करण्याची मागणी शिवसेनेने महापालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.शिवसेनेचे गटनेते विलास शिंदे यांच्या नेतृत्वाखालील नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. निवेदनात म्हटले आहे, पंचवटीतील मायको रुग्णालयात वैद्यकीय अधिकार्यासह एकही कर्मचारी उपस्थित नसल्याने एका गरीब महिलेची प्रसूती रिक्षातच झाली. सदर घटना अतिशय गंभीर आहे. वास्तविक रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी हे २४ तास कार्यरत असणे आवश्यक आहे. परंतु रुग्णालयातील मुख्य वैद्यकीय अधिकारी कोणतीही पर्यायी व्यवस्था न करता व अत्यावश्यक सेवा असताना रजेवर निघून गेले. पंचवटीतील पेठरोड भागात मोठ्या प्रमाणावर स्लम वसाहत आहे. मायको रुग्णालय तेथील गरीब लोकांना सोयीचे ठरते. मायको रुग्णालयात घडलेल्या या घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी नगरसेवक सुवर्णा मटाले, नयना गांगुर्डे, पूनम मोगरे, संगीता जाधव, हर्षदा गायकर तसेच सीमा निगळ आदींसह शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते.औषधे जातात कुठे?शिवसेनेने निवेदनात औषध खरेदीवरही प्रश्नचिन्ह उभे केले आहे. निवेदनात म्हटले आहे, वैद्यकीय विभागासाठी कोट्यवधी रुपयांची औषध खरेदी तसेच साहित्य खरेदी होत असते. परंतु, ही सारी औषधे व साहित्य जातात कुठे, याचा उलगडा होत नाही. आरोग्य व वैद्यकीय सेवा २४ तास असताना वैद्यकीय अधिकारी नावालाच दवाखान्यात येतात आणि रुग्णांना स्वत:च्या खासगी दवाखान्यात घेऊन जातात. याचीही चौकशीची मागणी शिवसेनेने केली आहे.
प्रसुतिप्रकरणी दोषींची सखोल चौकशीची शिवसेनेची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 3:39 PM
मायको रुग्णालय : शिवसेनेकडून आयुक्तांना निवेदन
ठळक मुद्देमहापालिकेचे अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे यांची भेट घेऊन निवेदन वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी हे २४ तास कार्यरत असणे आवश्यक