लोकमत न्युज नेटवर्कनाशिक : जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदासाठी गुरूवारी सकाळी अकरा वाजता विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले असून, ही निवडणूक महाविकास आघाडीकडून एकत्रीत लढण्याचे पक्षश्रेष्ठींच्या सुचना असल्या तरी, प्रत्यक्षात कॉँग्रेसला सोबत घेण्यास शिवसेना तयार नसल्याने गुंता वाढला आहे. दुसरीकडे ज्याची सदस्य संख्या जास्त त्याला अध्यक्षपद या न्यायाने शिवसेनेला अध्यक्षपद व राष्टÑवादीला उपाध्यक्षपद देण्यावर मात्र दोन्ही पक्षांचे एकमत झाले आहे. मात्र अध्यक्षपदाचा उमेदवार कोण यावरून शिवसेनेची दमछाक झाली असून, ज्यांच्या नावाची चर्चा अध्यक्षपदासाठी होत होती, त्या नावाला राष्टÑवादीच्या एका गटाचा विरोध असल्यामुळे रात्री उशिरापर्यंत सेनेचा उमेदवार ठरू शकला नाही. दरम्यान, गुरूवारी सकाळी शिवसेना व राष्टÑवादीच्या नेत्यांची बैठक होणार असून, त्यानंतर नाव निश्चित होणार असल्याचे सांगण्यात आले.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणुकीसाठी शिवसेनेकडून कॅबिनेट मंत्री दादा भुसे, संपर्क नेते भाऊसाहेब चौधरी हे रात्री उशिरा नाशकात दाखल झाले तर राष्टÑवादीच्या वतीने बुधवारी छगन भुजबळ, माजी खासदार समीर भुजबळ, कोंडाजी मामा आव्हाड, पंढरीनाथ थोरे आदींनी इच्छूकांची चाचपणी केली. सहलीसाठी रवाना झालेल्या शिवसेना व राष्टÑवादीच्या सदस्यांमधील काही इच्छूक सदस्यांनी बुधवारी सहल अर्धवट सोडून भुजबळ यांची भेट घेतली. त्यात उषा दराडे यांच्यासाठी सेनेचे आमदार किशोर दराडे, इच्छूक बाळासाहेब क्षिरसागर, शंकर धनवटे आदींचा समावेश होता. तर राष्टÑवादीच्याही इच्छूकांनी भुजबळ यांची भेट घेवून आपले म्हणणे मांडले. बाळासाहेब क्षिरसागर यांच्या नावाला निफाड तालुक्यातील राष्टÑवादीच्या काही सदस्यांचा विरोध आहे तर दराडे यांच्या नावाला सेनेंतर्गंत विरोध असून, एकाच घरात सारी पदे देण्यास व त्यातही पुन्हा महिलेला अध्यक्ष करण्यास सदस्यांची इच्छा नाही त्यामुळे खुद्द शिवसेनेसमोरही पेच निर्माण झाला असून, राष्टÑवादी मात्र अध्यक्षपदाच्या उमेदवारावर लक्ष ठेवून आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून एकत्रित सहलीसाठी गेलेल्या शिवसेना व राष्टÑवादी सदस्य परतीच्या मार्गावर लागले असून, बुधवारी सकाळी त्यांनी कोल्हापूरच्या अंबाबाईचे दर्शन घेवून नाशिककडे रवाना झाले. रात्री उशिरा त्यांचे आगमन झाले.अध्यक्षपदासाठी उमेदवारी दाखल करण्यासाठी दुपारी बारा वाजेची वेळ असल्याने तत्पुर्वी सकाळी शिवसेनेच्या नेत्यांबरोबर बैठक घेण्यात येवून त्यातून सहमतीने अध्यक्षपदाचा उमेदवार ठरविण्यात येणार असल्याची माहिती राष्टÑवादीचे माजी खासदार समीर भुजबळ यांनी सांगितले.