नाशिक : छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचा उत्साह शिवभक्तांमध्ये ओसांडून वाहत असून, गेल्या महिनाभरापासून विविध मंडळांनी शिवजन्मत्सव सोहळ्याची आणि मिरवणुकीची तयारी केली आहे. मात्र राज्य शासनाने ऐनवळी शिवजयंती साजरी करताना कोरोना संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता शिवजन्मोत्सव साध्या पद्धतीने करण्याच्या सूचना केल्याने शिवभक्तांनी नाराजी व्यक्त केली आहे. मात्र शिवभक्तांचा उत्साह कणभरही कमी झालेला नाही. त्यामुळे यावर्षीही शिवजयंती सोहळा जल्लोषाताच साजरा होणार आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणात एकत्र न येता साधेपणाने शिवजयंती उत्सव साजरा करणे अपेक्षित असल्याचे नमूद करतानाच कोणत्याही प्रकारे सार्वजनिक ठिकाणी पोवाडे, व्याख्यान, गाणे, नाटक इत्यादींचे सादरीकरण अथवा इतर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येऊ नये. त्याऐवजी सदर कार्यक्रमाचे केबल नेटवर्क अथवा ऑनलाइन प्रक्षेपण उपलब्ध करून देण्याबाबत व्यवस्था करण्यात यावी तसेच, कोणत्याही प्रकारे प्रभातफेरी, बाइक रॅली, मिरवणुका काढण्यात येऊ नयेत. त्याऐवजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अथवा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्याचा कार्यक्रम आयोजित करून त्या ठिकाणी फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करून केवळ दहा व्यक्तींच्या उपस्थितीत शिवजयंती साजरी करण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे शिवजयंती मिरवणूक काढणाऱ्या विविध संघटनांनी नाराजी व्यक्त करीत यातून तोडगा काढण्यासाठी संघनात्मक बैठका घेऊन यातून तोडगा काढण्यासाठी मंथन सुरू केले असून, कोणत्याही परिस्थिती यावर्षीचा शिवजन्मोत्सव जल्लोषातच साजरा करण्याचा निर्धार शिवभक्तांनी केला आहे.
कोट- १
शासनाची परवनागी मिळाली तरच मिरवणुकीत सहभागी होऊ अन्यथा काठेगल्ली सिग्नल परिसरात परंपरेनुसार शिवजन्मोत्सव साजरा करू, त्याचा शिवभक्तांच्या उत्साहावर काही परिणाम होणार नाही. शिवजयंती जल्लोषातच साजरी होईल.
- हर्षद इंगळे, अध्यक्ष, अर्जुन क्रीडा मंडळ, द्वारका
कोट- २
शिवभक्तांमध्ये शिवजयंतीचा जल्लोष दरवर्षीप्रमाणे ओसांडून वाहत आहेत, मिरवुणीकीसंदर्भात चर्चा सुरू आहे. मात्र कोणताही निर्णय आला तरी शिवभक्तांच्या उत्साहावर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही. शिवजयंती सोहळा उत्साहातच होईल. त्याची तयारीही पूर्ण झाली आहे.
-हरी अंबेकर, अध्यक्ष, गजानन महाराज मित्रमंडळ
कोट - ३
दरवर्षी प्रमाणे यावर्षीही जल्लोषात शिवजयंतीची मिरवणूक काढण्यात येईल, महिनाभरापूर्वीच मिरणूक काढण्याची तयारी करण्यात आली आहे. आता ऐनवेळी मिरवणुकीचा कार्यक्रमा रद्द होणार नाही. आणि शिवभक्तांचा उत्साह कमी होणार नाही.
-सागर देशमुख , स्वराज्य प्रतिष्ठान, इंदिरानगर
-
कोट-४
शिवजन्मोत्सव समितींना सोबत घेऊन महिनाभरापासून मिरवणूक व शिजन्मोत्सव जोरदार साजरा व्हावा यासाठी गृहमंत्री, पालकमंत्री, जिल्हाधिकाऱ्यांच्या सोबत मीटिंग घेऊन शिजन्मोत्सव जल्लोषात साजरा करण्याचे ठरले होते. त्यानंतर सर्व मिरवणूक व शिवजन्मोत्सव सोहळ्याच्या तयारीला लागले. आता तयारी पूर्ण झाल्यानंतर ऐनवेळी बंधने लादली गेली. त्यामुळे सगळे शिवभक्त संतप्त आहे. मात्र कोणत्याही परिस्थिती शिवभक्तांचा उत्साह कमी होणार नाही. शिवजन्मोत्सव जल्लोषातच साजरा होईल.
- चेतन शेलार, अध्यक्ष, छत्रपती सेना
कोट-५
प्रशासनाकडून कोरोनाचे प्रतिबंधात्मक नियम पाळून व्यासपीठावरील कार्यक्रमास परवानगी आहे. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही शिवजन्मोत्सव जल्लोषातच होणार आहे. परंतु, शासनाकडून निवडणूक आणि अन्य कार्यक्रमांना परवानगी दिली जात असना शिवजयंती मिरवणुकीवर बंदी घालने निषेधार्ह आहे.
-विक्रम कोठुळे, अध्यक्ष , शिवजन्मोत्सव सोहळा समिती, नाशिकरोड
कोट-६
शिवजयंती मिरवणूक काढण्यास परवानगी नाही. त्यामुळे शासनाच्या नियमांचे तंतोतंत पालन करणार आहे. परवानगी दिल्यास दुचाकी रॅली काढण्यात येईल. यंदा पंचवटी शिवजन्मोत्सव समितीतर्फे पंचवटी कारंजा येथे मोठ्या उत्साहात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात येणार आहे. शिवजयंतीनिमित्त पंचवटी शिवजन्मोत्सव समितीतर्फे रक्तदान तसेच कोरोना योद्ध्यांचा सत्कार केला जाणार आहे.
- मामा राजवाडे, अध्यक्ष, पंचवटी शिवजन्मोत्सव समिती
कोट-७
सातपूरला सर्वपक्षीय शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्ताने यावर्षी 'शिवपुत्र संभाजीराजे' या ऐतिहासिक महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे. शासनाच्या मार्गदर्शक सूचना व सर्व नियम पाळून शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. आम्ही मिरवणूक काढणार नाही. गेल्या पाच वर्षांपासून आम्ही ‘एक गाव एक शिवजन्मोत्सव’ सोहळ्याचे आयोजन करीत आहोत.
- गंगाराम सावळे ,अध्यक्ष, शिवजन्मोत्सव समिती सातपूर
कोट-८
दरवर्षी शिवजयंती मिरणुकीत सहभाग असतो. मात्र यावर्षी मिरणुकीत सहभागी न होता या हनुमाननगर येथे मास्क वाटप करून शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करणार आहे. यावेळी कोरोनाप्रतिबंधात्मक नियमांचे पालन केले जाईल.
- अजय कडभाने, छावा मराठा युवा संघटना
कोट-९
शिवजयंतीला पोलीस प्रशासनाकडून अनेक नियम लागू करण्यात आले आहेत. परंतु अशाही परिस्थितीत पोलिसांनी दिलेल्या नियमांचे पालन करीत तसेच कोरना प्रतिबंधात्मक नियमांचेही पालन करून जल्लोषात शिवजयंती साजरी करणार आहे.
-पवन मटाले , सर्व पक्षीय शिवजयंती समिती, नवीन नाशिक