सातपूर : शिवजन्मोत्सव समितीतर्फे यावर्षीही मिरवणुकीला फाटा देत आयोजित केलेल्या 'शंभूराजे' या महानाट्याच्या माध्यमातून हजारो शिवप्रेमींनी छत्रपती संभाजी महाराजांच्या जन्मापासून ते बलिदानापर्यंतचा धगधगता इतिहास अनुभवला
शिवजयंतीनिमित्त सातपूर शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने अशोकनगर येथील जाणता राजा मैदानावर रुद्र फाउंडेशन निर्मित श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि श्री छत्रपती संभाजी महाराज यांचा पराक्रम दाखविणारे 'शंभूराजे' या ऐतिहासिक महानाट्याचे आयोजन करण्यात आले होते. मैदानावर शिवतीर्थ अर्थात शिवरायांचे आकर्षक देखणे असे मंदिर उभारण्यात आले होते. यावेळी नेत्रदीपक आकर्षक आतिषबाजी, अत्याधुनिक ध्वनी-प्रकाशयोजना, अभिजात लोककलाकारांनी नटलेला ऐतिहासिक सोहळ्यात छत्रपती संभाजी महाराज जन्म ते त्याच्या बलिदानापर्यंत चा धगधगता इतिहास दाखविण्यात आला. प्रा.नितीन बानगुडे पाटील लिखित आनंद जावडेकर दिग्दर्शित श्री संभाजी महाराजांची भूमिका मयूर घोलप यांनी साकारली. दरम्यान, शिवजन्मोत्सव सोहळा समितीचे अध्यक्ष गंगाराम सावळे कार्याध्यक्ष कांता शेवरे यांनी शिवप्रेमींचे स्वागत केले. यावेळी शिवजन्मोत्सव समितीचे बाळासाहेब रायते, जिवन रायते, नितीन निगळ, दिनकर कांडेकर, गणेश बोलकर, किशोर निकम, अनिल गडाख, संजय राऊत, निवृत्ती इंगोले, हिरामण रोकडे, सुरेश खांडबहाले, गौरव जाधव, दीपक वाकचौरे,बाळासाहेब जाधव, अमोल ईघे, रामहरी संभेराव, बाळासाहेब पोरजे, हेमंत शिरसाठ, दिलीप नेरे, विजय धुमाळ आदींसह समितीच्या पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. .सूत्रसंचालन राजेश खताळे यांनी केले.
रामशेज किल्ल्यावरील पवित्र कलशाचे दर्शन
जाणता राजा मैदानावर साकारण्यात आलेल्या शिवमंदिरात रामशेज किल्ल्यावरील पवित्र मातीचा कलश दर्शनासाठी ठेवण्यात आला होता. शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला छत्रपती शिवरायांची महाआरती करण्यात आली. प्रा.शिवशाहीर प्रवीण जाधव यांचा संगीतमय शिवचरित्रावर आधारित गर्जते मराठी शायरी पोवाड्याचे आयोजन करण्यात आले होते.
इन्फो-
सातपूर परिसरात शोभायात्रा
सातपूरच्या मंडईतील शिवछत्रपतीच्या पुतळ्याचे शनिवारी सकाळी पूजन करण्यात आले. सायंकाळी सहा वाजता कार्यक्रमस्थळी मुख्य प्रवेशद्वारापासून सातपूर परिसरात शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ, आमदार सीमा हिरे, माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार डॉ.अपूर्व हिरे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, नगरसेवक दिनकर पाटील, सलिम शेख, विलास शिंदे, योगेश शेवरे,मधुकर जाधव, माधुरी बोलकर, इंदूबाई नागरे, हेमलता कांडेकर, डॉ.वर्षा भालेराव, छावा क्रांतीवीर सेनेचे अध्यक्ष करण गायकर, दिलीप गिरासे, शंकर पाटील, डॉ.अमोल वाजे, आदी प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते.