नाशिक : तीन लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी रंगेहाथ सापडलेले कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजी चुंभळे यांचा पाय खोलात गेला आहे. त्यांच्या निवासस्थानी अवैध मद्यसाठ्यात सैन्यदलातील राखीव कोट्यातील उच्चप्रतीच्या मद्याच्या ६५ बाटल्या आढळून आल्याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाने चुंभळे यांना मंगळवारी (दि.२०) सायंकाळी अटक केली. विभागाच्या कार्यालयात त्यांची चौकशी करण्यात येऊन रात्री उशिरा त्यांना पुन्हा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात येणार होते.लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहाथ सापडलेल्या चुंभळे यांच्या घरांची झाडाझडती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने घेतली. यावेळी त्यांच्या एका फार्महाउसवर मोठ्या प्रमाणात देशी-विदेशी मद्याच्या बाटल्यांचा साठा आढळून आला. या साठ्यात सैन्यदलाच्या राखीव कोट्यामधील काही ब्रॅन्डच्या एकूण ६५ बाटल्या असल्याचेही तपासात निष्पन्न झाले. त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात विदेशी मद्यसाठा कसा ठेवला? तसेच सैन्याच्या राखीव कोट्यातील मद्य कसे मिळविले? याबाबत तपास करावयाचा असल्याने संशयित चुंभळे यांचा राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्हा न्यायालयाकडे ताबा सोमवारी मागितला होता.चुंभळे यांनी जीवितास धोका असल्याचे सांगून संरक्षण देण्याची मागणी पत्राद्वारे पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली आहे. लाचप्रकरणी दाखल केलेल्या तक्रारदारानेदेखील पोलीस अधिकाऱ्यांकडे संरक्षणाची मागणी करत जीवितास धोका असल्याचे सांगितले आहे.
शिवाजी चुंबळे यांना उत्पादन शुल्ककडून अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2019 1:40 AM