नाशिक : शिवसेनेतून हक्कालपट्टी झालेले माजी नगरसेवक अॅड. शिवाजी सहाणे यांनी अनेकदा पक्षविरोधी कारवाया करीत आगामी विधानपरीषदेसाठी स्वयंघोषीत उमेदवारीही जाहीर केली. त्यामुळे पक्ष नेत्वृत्वाने कारवाई करीत त्यांची शिवसेनेतून हक्कालपट्टी केली. पक्षातर्फे विधान परिषदेसाठी अद्याप कोणाचीही उमेदवारी निश्चित झालेली नसताना केवळ पक्षातून हक्कालपट्टी केल्यामुळेच सहाणे उमेदवारी नाकारल्याचा कांगावा करीत असल्याचे प्रत्युत्तर शिवसेनेचे महानगरप्रमुख सचीन मराठे व माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड यांनी अॅड. शिवाजी सहाणे यांना दिले आहे. विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातून उमेदवारी देताना आपण मराठा समाजातील असल्यामुळे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी उमेदवारी नाकारल्याचा आरोप केल्यानंतर शिवसेनेने मंगळवारी (दि.27) शालीमार येथील मध्यवर्ती कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन तत्काळ पक्षाची भूमिका स्पष्ट केली. मराठा क्रांती मोर्चात शिवसेनेसह सर्वपक्षीय नेत्यांनी सक्रीय सहभाग घेतला होता. परंतु, शिवाजी सहाणोंसारखे लोक मराठा क्रांती मोर्चाचे राजकीय भांडवल करू पाहत असल्याचा आरोपही शिवसेनेतर्फे पत्रकार परीषदेतून करण्यात आला. तसेच शिवसेनेने शिवाजी सहाणे यांना यापूर्वी विधान परिषदेसाठी उमेदवारी दिली होती. त्यामुळे त्यांनी जातीय द्वेषातून उमेदवारी नाकारल्याचा केलेला आरोप निराधार आहे. शिवसेनेने सहाणे यांना उमेदवारी देताना त्यावेळीही त्यांची जात पाहिली नाही. आणि आताही त्यांची जात पाहून पक्षातून हक्काल पट्टी केली नाही. परंतु, तरीही सहाणे जातीय द्वेशातून कारवाई झाल्याचे सांगत असतील तर त्यांनीच जात बदलली आहे का असा पलटवारही शिवसेनेतर्फे यावेळी करण्यात आला. यावेळी शिवसेनेचे माजी जिल्हाध्यक्ष विनायक पांडे, महानगरप्रमुख महेश बडवे, उपजिल्हाप्रमुख जगन आगळे,नगरसेवक सुधाकर बडगुजर, विद्यार्थी सेना जिल्हाप्रमुख योगेश बेलदार आदि उपस्थित होते.