सिडको : पुलवामा घटनेमध्ये भारतीय जवान शहीद झाल्याने शिवजन्मोत्सव साधेपणाने साजरा करून जमा झालेला निधी सदर जवानांच्या कुटुंबीयांना देण्याचा निर्णय सिडको जन्मोत्सव समितीच्या वतीने घेण्यात आला होता. बुधवारी (दि.२७) समितीच्या पदाधिकाऱ्यांनी एक लाख रुपयांचा निधी मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला.पुलवामा घटनेमध्ये जे भारतीय जवान शहीद झाले त्यांच्याप्रति सिडको शिवजयंती समितीच्या वतीने शिवजयंती साधेपणाने साजरी करून मिरवणुकीवरील खर्च हा शहीद जवानांच्या जवानांच्या कुटुंबीयांना देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेत जमा झालेला एक लाख रुपयांचा निधी जमा केला. सदरचा निधी शहीद जवान नितीन राठोड यांच्या वीरपत्नी वंदना नितीन राठोड तसेच शहीद जवान संजय राजपूत यांच्या वीरपत्नी सुषमाबाई संजय राजपूत यांना देण्यात येणार आहे़ या उपक्रमाबाबत मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले.यावेळी वैभव देवरे, मुकेश शेवाळे, अंकुश वराडे, आशिष हिरे, विजय पाटील, योगेश जाधव, योगेश गांगुर्डे, प्रसाद पाटोळे, रोहित उघडे, निखिल पवार, अजय गोसावी आदी उपस्थित होते. सिडको परिसरात मागील वर्षीप्रमाणे यावर्षीदेखील शिवजन्मोत्सव १८ पगड जाती सोबत घेऊन जल्लोेषात साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु पुलवामा घटनेत ४०हून अधिक जवान शहीद झाल्याने शिवरायांची शिकवण लक्षात घेत कोणत्याही प्रकारची मिरवणूक न काढता यावर्षी साधेपणाने शिवजन्मोत्सव साजरा करणे हीच शहीद जवानांना खरी श्रद्धांजली ठरेल, असा निर्णय घेतला होता. त्यानुसार शिवजयंती साधेपणाने साजरी करून जमा झालेला निधी मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द करण्यात आला.
शिवजन्मोत्सवाचा निधी शहीद जवानांच्या कुटुंबीयांना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2019 12:47 AM