नाशिक : कैलास राणा शिव चंद्रमौळी, फणींद्र माथा मुकटी झळाळी, कारुण्य सिंधू भव दु:ख हारी, तुजवीण शंभो मज कोण तारी...असा जयघोष करत सोमवारी (दि. २१) श्रावणमासाची मोठ्या उत्साहात सांगता करण्यात आली. गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेल्या श्रावण महिन्याची पिठोरी अमावास्या अर्थात पोळा सणाने सांगता झाली. श्रावण महिन्याच्या अखेरच्या दिवशी पहाटेपासूनच महापूजेनंतर अभिषेक आणि रुद्राभिषेकानंतर शृंगार सोहळा, बिल्वार्चन यांसह विविध धार्मिक कार्यक्रमांचे यावेळी आयोजन करण्यात आले होते. सोमवारी संध्याकाळी पंचवटी परिसरातून पंचमुखी कपालेश्वर मुकुटाची सवाद्य पालखी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी पालखी मार्गात ठिकठिकाणी भव्य रांगोळीदेखील रेखाटण्यात आली होती.या पालखीत फक्त श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी कपालेश्वर मंदिराच्या गाभाºयात ठेवण्यात येणाºया पंचमुखी चांदीच्या मुकुटाची पारंपरिक पद्धतीने सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी काढण्यात आलेल्या पालखी सोहळ्यात ढोल, पालखी, ताशा यांच्या वादनाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.भक्तिचरणदास महाराज यांनी यावेळी गोदापात्रात सहस्त्र मातीच्या पिंडींचे विसर्जन केले. पालखी सोहळ्यादरम्यान शहराच्या विविध भागातील विद्यार्थ्यांनी शंकर, पार्वती, नंदी, गणपती, कार्तिकेय यांची वेशभूषा करून सहभाग नोंदवला, तसेच या पालखी सोहळ्यात गोदाजलाचा समावेश असलेल्या कलशधारी महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला. श्रावण महिन्याची सांगता सोमवारी होत असल्याने तसेच या दिवशी सोमवती अमावास्येचा योग आल्याने या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले होते. सोमवारी (दि. २१) सकाळपासूनच सुरू असलेल्या मुसळधार पावसातही शिवभक्तांनी पंचवटीतील कपालेश्वर मंदिर, सोमेश्वर येथील महादेव मंदिर यांसह शहरातील विविध मंदिरांमध्ये दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. सोमवती अमावास्येमुळे रामकुंडावरदेखील भाविकांनी स्नानासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. श्रावण महिन्यात अनेक भाविकांनी केलेल्या संकल्पांची तसेच व्रत वैकल्यांची सोमवारी सांगता करण्यात आली. श्रावण महिन्यानंतर आता सर्वांना गणेशोत्सवाचे वेध लागले असून, नाशिकर गणेशभक्तीत लीन होणार आहेत.
शिवाच्या जयघोषाने श्रावणमासाची सांगता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2017 12:31 AM