नाशिक : राष्टवादीकडून विधानसभा निवडणूक लढविणाऱ्या माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी निवडणुकीनंतर अवघ्या दहा दिवसांतच राष्टवादीला सोडचिठ्ठी देत हाती शिवबंधन बांधले आहे. रविवारी सकाळी सानप खासदार संजय राऊत यांच्यासह मातोश्रीवर पोहचले आणि त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्या सेना प्रवेशामागे नेमके काय दडलंय याचीच चर्चा शहरात दिवसभर सुरू होती.रविवारी सकाळी सानप यांनी मुंबई गाठली आणि उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून घेतले. त्यांच्या या निर्णयाची त्यांनी राष्टवादीच्या कुणालाही कल्पना दिली नव्हती शिवाय अगदी निवडक कार्यकर्त्यांस सानप रविवारी सकाळी राऊत यांच्याकडे पोहचले आणि तेथून त्यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेनेत प्रवेश केला.विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून नाशिक पूर्व मतदारसंघात अनेक नाट्यमय राजकीय घडामोडी घडल्या. भाजपचे आमदार व शहराध्यक्ष असलेल्या बाळासाहेब सानप यांना उमेदवारी मिळावी यासाठी सानप समर्थकांनी शक्तिप्रदर्शन केले होते. परंतु पक्षाने अखेरच्या दिवसापर्यंत सानप यांना उमेदवारी दिली नाही, याउलट मनसेकडून इच्छुक असलेले राहुल ढिकले यांना उमेदवारी देऊन भाजपने सानप यांचा पत्ता कट केला. त्यामुळे नाराज सानप यांनी अखेरच्या क्षणी राष्टवादीत प्रवेश करून पूर्व मतदारसंघातून भाजपविरोधात दंड थोपटले. या मतदारसंघात भाजपविरु द्ध राष्टवादी अशी सरळ सरळ दुरंगी लढत झाली. भाजपचे ढिकले यांनी सानप यांच्यावर मात केली.भाजपने तिकीट कापल्यानंतर राष्टवादीचे घड्याळ बांधून भाजपविरोधात निवडणूक लढविणाऱ्या सानप यांनी पराभूत होताच ‘घड्याळ’ उतरवून मनगटावर शिवबंधन बांधून घेतल्याने त्यांच्या भूमिकेविषयी दिवसभर शहरात चर्चा सुरू होती.राष्टवादीत मोठ्या जबाबदारीचे होते संकेतनिवडणुकीत पराभव पत्करावा लागल्यानंतर सानप हे दोन दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी पक्ष कार्यालयातील कार्यक्रमाला उपस्थित झाले होते. यावेळी आमदार छगन भुजबळ यांनी त्यांच्यावर पक्ष मोठी जबाबदार सोपविणार असल्याचेदेखील जाहीर केले होते. राष्टवादीकडून नेमकी कोणती जबाबदारी दिली जाणार याविषयीचे अंदाज बांधले जात होते.