मालेगाव : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शिवजयंती मध्यवर्ती उत्सव समितीने शुक्रवारी शिवज्योत मिरवणूक काढली होती. येथील अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. शहर व तालुक्यात जयंतीनिमित्त चैतन्याचे वातावरण दिसून आले. ठिकठिकाणी प्रतिमा व पुतळ्याचे पूजन करण्यात आले. शहरात भगव्या कमानी व भगवे झेंडे लावण्यात आल्याने शहर भगवेमय झाले होते. तालुक्यातील विविध गावांमध्ये महाराजांच्या पुतळ्याची विधीवत पूजा करण्यात आली. शुक्रवारी सकाळी ११ वाजता शिवजयंती मध्यवर्ती उत्सव समितीने शिवज्योत मिरवणूक काढली होती. या मिरवणुकीला मोसम पुलावरील महात्मा जोतिबा फुले यांच्या पुतळ्यापासून प्रारंभ झाला. शिवज्योत मिरवणूक संगमेश्वर-रामसेतू पूल -टिळक चौक, नेहरू चौक, कीदवाईरोड-डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा मार्गे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या परिसरात काढण्यात आली. यावेळी मध्यवर्ती समितीचे अध्यक्ष श्याम देवरे, दीपक पाटील, दीपक जगताप, शरद बच्छाव, कैलास तिसगे, जितेंद्र देसले, कैलाश शर्मा, मच्छिंद्र शिर्के, राजेश अलीझाड, जितू पाटील, दीपक सावळे आदींसह पदाधिकारी, शिवप्रेमी उपस्थित होते.
---------------------
लक्षवेधी पेहराव
विशाल बच्छाव या तरुणाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखा पेहराव करून घोड्यावर बसून मिरवणुकीत सहभाग घेतल्याने लक्षवेधी ठरले होते. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पदाधिकाऱ्यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय जय, भवानी जय शिवाजी आदी घोषणा देण्यात आल्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सटाणानाका भागातील एकता मंडळ शिवतीर्थावर आकर्षक अशी विद्युत रोषणाई केली होती. पुतळा परिसरात मोठ्या प्रमाणात डिजिटल फलक लावून महाराजांना अभिवादन करण्यात आले.