अतुल शेवाळे : मालेगाव येथील साई आर्ट संस्थेच्या कलाकारांनी चार दिवस व चार रात्र परिश्रम घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याची आठ बाय अठरा आकाराची भव्य रांगोळी काढून छत्रपती शिवाजी महाराजांना अनोख्या पद्धतीने अभिवादन केले आहे. आज, शिवजयंतीनिमित्त शहरातील नागरिकांना पाहण्यासाठी ही रांगोळीची प्रतिकृती खुली होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना जयंतीनिमित्त अनोख्या पद्धतीने अभिवादन करावे या हेतूने येथील राजराजेश्वरी बहुउद्देशीय सामाजिक संस्था संचलित साई आर्टचे प्रमोद आर्वी यांच्या संकल्पनेतून शिवराज्याभिषेक सोहळ्याची भव्य रांगोळी काढण्यात आली. नऊ मुली व तीन मुले अशा बारा कलाकारांनी आठ बाय अठरा आकाराची भव्य रांगोळी संस्थेच्या कार्यालयात काढली आहे. बारा कलाकारांनी तब्बल चार दिवस चार रात्र परिश्रम घेतले. यासाठी ४८ किलो लेख कलरच्या रांगोळीचा वापर करण्यात आला. सांगली, सातारा येथून ही विशेष रांगोळी मागविण्यात आली होती. चारशे ते पाचशे रुपये प्रति किलो दराने ही रांगोळी बाजारात उपलब्ध असते. यापूर्वी संस्थेने शहीद भगतसिंग, नोटाबंदी, सर्जिकल स्ट्राइक, उरी हल्ला अशा विषयांवर रांगोळी काढली आहे. छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळ्याची रांगोळी शहरातील कलाप्रेमींसाठी रविवारी सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत खुली ठेवण्यात येणार आहे. शहरातील नागरिकांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे संचालक आर्वी यांनी केले आहे.
शिवरायांना अनोख्या पद्धतीने मुजरा
By admin | Published: February 19, 2017 1:29 AM