हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर शिववंदनेसाठी उसळलेली शिवप्रेमींची अलोट गर्दी.
नाशिक : ‘तुमचं आमचं नातं काय, जय जिजाऊ जय शिवराय’ या गगनभेदी गर्जनेसह शिवभक्तांनी छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराजांच्या जयघोषाने सोमवारी (दि.१९) अवघी नाशिकनगरी दणाणून सोडली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त कान्हेरे मैदानापासून ते पंचवटी कारंजापर्यंत काढण्यात आलेल्या पालखी मिरवणुकीत छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार करण्यात आला. यावेळी पालखी सोहळ्यात सहभागी पारंपरिक वाद्यांच्या तालावर विविध लोककलांच्या सादरीकरणासोबत लेजीम पथक आणि मिरवणुकीत शिवभक्तांनीही ठेका धरला.छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सव सोहळ््यानिमित्त हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर सकाळी शिववंदना व जिजाऊ वंदना करण्यात आली. यावेळी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांच्या हस्ते आयोजकांना एक लाख नागरिकांच्या सहभागासह शिवजन्मोत्सव साजरा करण्यासाठी जिनियस बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्ड आणि वंडर बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदीचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी शिवजन्मोत्सव सोहळा समितीचे ग्रामीण अध्यक्ष आमदार अपूर्व हिरे, शिवजन्मोत्सव सोहळा समितीचे शहर अध्यक्ष सुनील बागुल, आमदार सीमा हिरे, छावा क्रांतिवीर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर आदींसह विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. त्यानंतर गगणभेदी तुताºयांच्या निनादांसह ढोल-ताशांच्या गजरात मिरवणुकीला सुरुवात झाली. मिरवणुकीत छत्रपती शिवाजी महाराजांचा संत तुकाराम महाराज यांच्यासोबतचा संवाद दाखवणारा चित्ररथ, त्यानंतर राजमाता जिजाऊ बाल शिवाजींना स्वराज्य स्थापनेचे धडे देतानाचे दर्शन घडविणाºया चित्ररथासोबतच संभाजी महाराजांची शौर्यगाथा सांगणाºया चित्ररथांचाही मिरवणुकीत समावेश करण्यात आला होता.
पालकमंंत्र्यांनीही धरला ठेकाछत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सव पालखी सोहळ्याचे दर्शन घेण्यासाठी नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनीही हजेरी लावली. यावेळी त्यांच्यासोबत आमदार बाळासाहेब, महापौर रंजना भानसी आदी पदाधिकाºयांनी छत्रपतींच्या पालखीचे दर्शन घेतले. यावेळी उपस्थित शिवभक्तांनी त्यांना मिरवणुकीत सहभागी होण्याचे आवाहन केल्यामुळे पालकमंत्र्यांनी ढोल-ताशांच्या तालावर ठेका धरत लेजीम खेळण्याचा आनंद घेतला.
महिलांसह आबालवृद्धांचा सहभागशिवजन्मोत्सव पालखी सोहळ्यात बहुजन समाजाच्या आबालवृद्धांनी मोठ्याप्रमाणात सहभाग घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले. यात महिलांची संख्याही लक्षणीय होती, महिलांनी भगवे फेटे बांधून मिरवणुकीत सहभाग घेतला, तर लहान बालकांनी छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांची वेशभूषा करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.