नाशिक - महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १३ मधील पोटनिवडणुकीत मनसेसह शिवसेना आणि भाजपा उमेदवार रिंगणात उतरले आहेत. मात्र, सुरुवातीला सेना विरुद्ध भाजपा असा सामना रंगण्याची शक्यता व्यक्त होत असतानाच आता मनसे विरुद्ध भाजपा यांच्यात लढत होणार असल्याची चर्चा रंगली आहे. शिवसेनेतील अंतर्गत गटबाजीमुळे उमेदवाराच्या प्रचारात नेते गायब असल्याने शिवसैनिकच धुरा सांभाळताना दिसून येत आहे. त्यामुळे सेना उमेदवार अडचणीत सापडल्याची चर्चा आहे.प्रभाग क्रमांक १३ मधील पोटनिवडणूक येत्या ६ एप्रिल रोजी होत असून गेल्या सप्ताहापासून उमेदवारांकडून घरोघरी जाऊन प्रचार केला जात आहे. याशिवाय, उमेदवारांच्या प्रचारफेऱ्याही निघत आहेत. निवडणुकीत ८ उमेदवार रिंगणात असले तरी खरी लढत मनसेच्या वैशाली भोसले, सेनेच्या स्नेहल चव्हाण आणि भाजपाच्या विजया लोणारी यांच्यातच आहे. मनसेच्या उमेदवारासाठी माजी आमदार नितीन भोसलेंसह कॉँग्रेसचे नगरसेवक शाहू खैरे व वत्सला खैरे तसेच राष्टवादीचे नगरसेवक गजानन शेलार हे प्रचारात सक्रीय झाले आहेत तर भाजपाच्या उमेदवारासाठी स्थानिक पदाधिकारीही बूथ स्तरावर कार्यरत असल्याचे दिसून येत आहे. मनसेच्या उमेदवारासमोर तगडे आव्हान उभे करणाºया स्नेहल चव्हाण यांच्या प्रचारात मात्र, स्थानिक नेते गायब असल्याचे चित्र आहे. दोन दिवसांपूर्वी प्रभागात सेनेच्यावतीने प्रचार फे-यांचे नियोजन करण्यात आले होते. त्यासाठी मध्य विधानसभेच्या संपर्कप्रमुखाची धुरा सांभाळणारे मुंबईतील एक पदाधिकारी खास प्रचारफेरीसाठी नाशकात आले होते परंतु, स्थानिक नेत्यांमध्येच प्रचार फे-यांत सहभागी होण्याची उत्सुकता दिसून न आल्याने सदर पदाधिकाºयाने नाराजी व्यक्त करत मुंबई गाठल्याची चर्चा आहे. एका प्रचारफेरीसाठी खासदारांची उपस्थिती अपेक्षित धरण्यात आली होती. परंतु, खासदारानेही पाठ फिरविल्याचे सांगितले जाते. पक्षात गेल्या काही दिवसांत झालेले फेरबदल आणि घडामोडी यामुळे अंतर्गत गटबाजीला उधाण आले असून त्याचा फटका पोटनिवडणुकीला बसण्याची भीती शिवसैनिकांमधून व्यक्त केली जात आहे. शिवसैनिक प्रचारफे-यांत सहभागी होत असताना नेते मात्र सोयीस्कररित्या केवळ हजेरी लावत असल्याने उमेदवार अडचणीत आल्याचीही चर्चा आहे.नात्यागोत्याचे राजकारणपोटनिवडणुकीत नात्यागोत्याचेही राजकारण दिसून येत आहे. मनसेच्या उमेदवाराचे कॉँग्रेसच्या नगरसेवकांशी नातेसंबंध आहेत शिवाय सेनेतील काही पदाधिकाºयांशीही त्यांचे नाते आहे. त्यामुळे, उघडपणे प्रचारात येणे टाळले जात असल्याची चर्चा आहे. मनसेकडून दिवंगत नगरसेवक सुरेखा भोसले यांच्या कारकीर्दीत झालेल्या विकासकामांवर मते मागितली जात आहेत तर शिवसेना-भाजपाकडून प्रभागाचा विकास करण्याची आश्वासने दिली जात आहे.