नीलेश नहिरे
दाभाडी : पूर्वीचा दाभाडी मतदार संघ आणि आताचा मालेगाव बाह्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आमदारकीच्या मतदारसंघातील मुख्य असलेल्या दाभाडी गटातील लढत चुरशीची मानली जात आहे. या गटाने अनेक राजकीय नेत्यांना मुंबई ते दिल्लीची वारी करण्यास मदत केली आहे. मूळतः दाभाडी येथील लोकसंख्या, क्षेत्रफळ आणि मतदार संख्येने सर्वाधिक असल्याने तालुक्याच्या, जिल्ह्याच्या आणि आमदारकीच्या राजकारणाची दिशा ठरवित असतो म्हणूनच या गटावर संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहे. दाभाडी गटात सद्य:स्थितीला सेनेची प्रतिष्ठा पणाला लागली असली तरी भाजपसमोर पुन्हा विजयश्री खेचून आणण्याचे आव्हान आहे.
मागील निवडणुकीत एकाच घरातील देराणी आणि जेठाणी यांच्यात झालेली प्रमुख लढत ही जिल्ह्यातील चर्चेचा विषय बनला होता. या चुरशीच्या लढतीत सेनेच्या विद्या निकम यांचा पराभव करीत भाजपाच्या संगीता निकम यांनी विजय मिळवला होता. याआधी २०१२ च्या लढतीत दाभाडी गटाची रचना बदल झाल्याने तसेच गावातील एकाहून अधिक उमेदवारांच्या लढतीचा फायदा घेत मनसेतर्फे लढलेल्या संदीप पाटील यांनी विजय मिळविला होता. यात सेनेतर्फे लढलेले पंचायत समितीचे माजी सभापती शशिकांत निकम यांना पराभव स्वीकारावा लागला. यामुळेच यावर्षीही नव्याने केल्या जाणाऱ्या वाॅर्ड रचनेमुळे अनेक राजकीय गणिते बदलली जाणार असली तरी प्रमुख लढत भाजप व सेना यात होणार आहे. या लढतीत दाभाडी गावातून राष्ट्रवादी व काँग्रेसने उमेदवार दिल्यास त्याचा परिणाम गावाव्यतिरिक्त उभ्या राहणाऱ्या उमेदवारास होण्याची चिन्हे दिसत आहेत.
दाभाडी गटात सेनेला अनेक वर्षांपासून ग्रामपालिका, पंचायत समिती, आमदारकी या ठिकाणी स्थान मिळवता आले असले तरी आपला सदस्य निवडून आणता आला नसल्याने यावेळी कृषिमंत्री दादा भुसे यांचे या गटावर विशेष लक्ष आहे. गटासाठी अनेक नावे चर्चेत असली तरी प्रामुख्याने शिवसेनेकडून गिरणाकाठ फार्मर प्रोड्यूसर कंपनीचे चेअरमन प्रमोद निकम, पंचायत समितीचे माजी सभापती शशिकांत निकम, दाभाडीच्या सरपंच भावना निकम यांचे पती नीळकंठ निकम, भारतीय जनता पार्टीतर्फे युवा चेहरा म्हणून संजय हिरे, रावळगाव गटाचे जिल्हा परिषद सदस्य समाधान हिरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संजय निकम, डॉ. सुनील निकम, संदीप पाटील, राष्ट्रवादीतर्फे कृषिभूषण अरुण देवरे तर काँग्रेसतर्फे युवक काँग्रेस अध्यक्ष संदीप निकम यांच्या नावांची चर्चा आहे.