नाशिक : महापालिका निवडणुकीसाठी अद्याप तीन-साडेतीन महिन्यांचा कालावधी शिल्लक असताना सत्तातुर झालेल्या शिवसेनेकडून मात्र उमेदवारी अर्ज विक्रीस सुरुवात करण्यात आली आहे, तर भाजपाने मंडल अध्यक्षांकडून इच्छुकांची नावे मागवित चाचपणी चालविली आहे. केंद्र आणि राज्यात भाजपा सरकार सत्तारूढ झाल्यानंतर भाजपासह सत्तेत सहभागी झालेल्या शिवसेनेला आगामी महापालिका निवडणुकीतही सत्तेचे वेध लागले आहेत. महापालिकेत आता सेना-भाजपाचीच सत्ता येणार या अपेक्षेने दोन्ही पक्षांत प्रवेश करण्यासाठी अन्य पक्षांतील नगरसेवक व पदाधिकाऱ्यांमध्ये चढाओढ सुरू आहे. आतापर्यंत शिवसेनेत सर्वाधिक १७ नगरसेवकांनी प्रवेश केला आहे, तर भाजपात १२ नगरसेवकांनी प्रवेश केला आहे. पक्षांतराचा सर्वाधिक फटका सत्ताधारी मनसेला बसला असून, त्यांच्या तब्बल २१ नगरसेवकांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. त्याखालोखाल राष्ट्रवादी, कॉँग्रेस आणि माकपचा क्रमांक आहे. नाशिकरोड येथील दोन प्रभागांच्या पोटनिवडणुकीत भाजपाने दोन्ही जागा जिंकल्याने भाजपात दाखल होण्याच्या प्रक्रियेलाही वेग आला असताना दुखावल्या गेलेल्या सेनेनेही प्रतिष्ठा करत अधिकाधिक नगरसेवक व पदाधिकारी खेचण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, महापालिका निवडणुकीसाठी अद्याप तीन ते साडेतीन महिन्यांचा कालावधी शिल्लक असताना शिवसेनेने छापील उमेदवारी अर्ज विक्रीस प्रारंभही केला आहे. उमेदवारी अर्जासाठी प्रति २५०० रुपये आकारणी केली जात असून, त्यानिमित्त पक्षनिधीही गोळा होत आहे. प्रभागाची रचना आणि आरक्षण पाहून काही इच्छुकांनी आपले तिकीट निश्चित असल्याचे मानत अर्ज खरेदीही करून ठेवले आहेत. सेनेत सत्ताप्राप्तीसाठी लगीनघाई सुरू झाली असतानाच भाजपानेही मंडल अध्यक्षांकडून त्या-त्या मंडलातील प्रभागांमधील इच्छुकांची नावे मागविली आहेत. त्यामुळे भाजपातून उमेदवारी मिळविण्यासाठी मंडल अध्यक्षांचाही भाव वधारला आहे. (प्रतिनिधी)
शिवसेनेकडून अर्ज विक्रीस प्रारंभ
By admin | Published: October 20, 2016 2:27 AM