नाशिक : जिल्हा परिषदेची नवीन प्रशासकीय इमारत त्र्यंबकेश्वर रोडवरील जिल्हा परिषदेच्या मालकीच्या कुक्कुटपालन केंद्राच्या जागेवर प्रस्तावित करण्यात आली आहे. सुरुवातीला बांधकाम व अर्थ समिती सभापती मनीषा रत्नाकर पवार यांनी बांधकाम समितीच्या बैठकीत याबाबत ठराव संमत केला. दुसरीकडे अध्यक्ष शीतल सांगळे यांनी याप्रकरणी राज्यमंत्री दादा भुसे यांच्या पुढाकाराने मंत्रालयात बैठक आयोजित करून जागा मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र ही इमारत नेमक्या कोणाच्या प्रयत्नाने होणार यावरून आता शिवसेना व भाजपात श्रेयवादाची लढाई रंगण्याची चिन्हे आहेत. जिल्हा परिषदेच्या विद्यमान मुख्यालयाची जागा प्रशस्त वाहनतळाअभावी अपुरी पडत असून, लोकल बोर्डाच्या काळात उभारलेल्या जुन्या इमारतीला पर्याय म्हणून मुख्यालयाच्या मागील बाजूस नवीन प्रशासकीय विस्तारित इमारत उभारण्यात आली. या इमारतीत केवळ लघुपाटबंधारे पूर्व, महिला व बालकल्याण, ग्रामीण पाणीपुरवठा व माध्यमिक शिक्षण विभाग असे चारच विभाग स्थलांतरित झाले आहेत. तसेच नवीन प्रशस्त सभागृहही
या इमारतीत उभारण्यात आले आहे. मात्र अद्यापही जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा कार्यालय, पंतप्रधान ग्रामसडक योजना कार्यालय तसेच अन्य काही विभाग अद्यापही मुख्य इमारतीत आलेले नाहीत. त्यामुळे सातपूर आयटीआय जवळील जिल्हा परिषदेच्या कुक्कुटपालन केंद्रांच्या चार एकर जागेपैकी एक एकर जागेत जिल्हा परिषदेची नवीन प्रशासकीय इमारत बांधकाम करण्याचा ठराव बांधकाम समितीच्या बैठकीत संमत करण्यात आला. भाजपाच्या बांधकाम सभापती मनीषा पवार यांनी इमारत उभारणीसाठी निधी व कुक्कुटपालन केंद्राची जागा मिळावी म्हणून पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यापासून ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे पाठपुरावा केला. दुसरीकडे शिवसेनेच्या अध्यक्ष शीतल सांगळे यांनी शिवसेनेचे राज्यमंत्री दादा भुसे यांना यासंदर्भात मंत्रालयात तातडीची बैठक घेण्याची विनंती करून तशी बैठक घेऊन पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांना पशुसंवर्धन विभागाची जागा देण्याबाबत अनुकूलता मिळविली. मात्र या बैठकीसाठी अन्य कोणत्याही सभापतींना बैठकीचे निमंत्रण नसल्याचा आरोप झाला. त्यामुळे शिवसेना व भाजपात आता नवीन प्रशासकीय इमारतीवरून श्रेयवादाची लढाई रंगण्याची चिन्हे आहेत.गण्याची चिन्हे आहेत.