सिडको - कामगार वस्ती व औद्योगिक परिसराचा भाग असलेल्या प्रभाग क्रमांक २७ मध्ये प्रामुख्याने शिवसेना व भाजपचे वर्चस्व दिसून येते. परंतु यंदाच्या निवडणुकीत सेना व भाजपला शह देण्यासाठी मनसे राष्ट्रवादीसह अन्य पक्षांनीही तयारी सुरू केली आहे. मात्र, शिवसेनेतील इच्छुकांची वाढलेली संख्या त्यातही आजी-माजी नगरसेवक यामुळे शिवसेनेची डोकेदुखी वाढणार आहे.
पहिल्या पंचवार्षिकमध्ये नाना महाले, मंदाताई दातीर यांनी या प्रभागाचे नेतृत्व केले. प्रभागरचना बदलल्यानंतर काँग्रेसचे लक्ष्मण जायभावे, शिवसेनेचे मामा ठाकरे, डाव्या चळवळीतील सुमन सोनवणे अशा अनेकांना या परिसरातील मतदारांनी संधी दिली आहे. सध्याच्या प्रभाग क्रमांक २७ मध्ये शिवसेनेचे किरण दराडे व चंद्रकांत खाडे, तर भाजपचे राकेश दोंदे व कावेरी घुगे हे नगरसेवक प्रतिनिधित्व करीत आहेत. या प्रभागात शिवसेनेपाठोपाठ भाजपचे वर्चस्व असले तरी शिवसेनेतील इच्छुकांची दावेदारी नेत्यांच्या अडचणी वाढवणारी आहे.
गेल्यावेळी विद्यमान नगरसेवक असूनही पुंजाराम गामणे यांना थांबण्याचा सल्ला देण्यात आला होता. आता ते काही झाले तरी निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. पहिल्या पंचवार्षिक निवडणुकीतील नगरसेविका मंदाताई दातीर आणि अन्य अनेक आजी-माजी नगरसेवक सध्या दावेदारी करीत आहेत. प्रभागरचनेनंतर काही प्रमाणात तिढा सुटणार असला तरी डावलले गेलेले अडचणीचे ठरू शकतात. या प्रभागातून शिवसेनेकडून दोन विद्यमान नगरसेवकांसह माजी नगरसेवक पुंजाराम गामणे, तानाजी फडोळ, उत्तम दोंदे, मंदाताई दातीर या चार माजी नगरसेवकांनीदेखील तयारी सुरू केली आहे. यंदाच्या निवडणुकीत मात्र काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राष्ट्रवादी तसेच वंचित बहुजन आघाडीनेदेखील निवडणुकीची तयारी सुरू केल्याचे दिसून येत आहे.
प्रभागात अंबड गावाचा समावेश असून, अंबड गावाच्या एक गठ्ठा मतांवर अनेक इच्छुकांची दावेदारी आहे. मात्र, अंबड गावातूनच अधिक उमेदवार उभे राहिल्यास मतांचे विभाजन होऊन अन्य उमेदवारांना त्याचा फायदा होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. एकूणच येत्या निवडणुकीत शिवसेना -भाजप याबरोबरच महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राष्ट्रवादी काँग्रेस व वंचित बहुजन आघाडीसह इतर पक्ष कामाला लागल्याने या प्रभागात बहुरंगी लढत होण्याची चिन्हे दिसून येत आहे. मात्र, अन्य पक्षांना सक्षम उमेदवार शोधावे लागणार आहेत.