नाशिक : येत्या रविवारी (दि.१६) जिल्हा परिषदेच्या विषय समिती खातेवाटप व सदस्य निवडीची बैठक होत असून, बांधकाम व अर्थ समिती कळीचा मुद्दा ठरण्याची चिन्हे आहेत. शिवसेनेचे भाजपा-राष्ट्रवादीच्या आघाडीत ‘मिठाचा खडा’ टाकण्यासाठी राष्ट्रवादीला बांधकाम व अर्थ समिती सभापतिपद बहाल करण्याची खेळी करण्याची तयारी केल्याने भाजपाच्या गोटात अस्वस्थता आहे.दरम्यान, शिवसेनेने निवडणुकीत जास्त ताणल्यास बहुमत असल्याने थेट मतदान घेण्याची तयारी भाजपाने केली आहे. शनिवारी दुपारी २ वाजता शिवसेना व भाजपाच्या जिल्हा परिषदेतील काही नेत्यांची अनौपचारिक बैठक होणार असल्याचे कळते. या बैठकीनंतरच खऱ्या अर्थाने रविवारी होणाऱ्या विषय समिती सभापती व सदस्य निवडीचे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे. कोणत्याही परिस्थितीत बांधकाम व अर्थ समिती मिळविण्यासाठी भाजपाची आग्रही भूमिका असल्याचे कळते. शुक्रवारपासून (दि.१४) चार दिवस परदेश वारीवर गेलेले नाशिक भाजपाचे प्रभारी पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी भाजपा नेत्यांना जिल्हा परिषदेत सत्तेची आर्थिक चावी अर्थात बांधकाम व अर्थ समिती आपल्याकडेच ठेवण्याचा कानमंत्र दिल्याची चर्चा आहे. विषय समिती खातेवाटपाचे अधिकार पीठासन अधिकाऱ्यांना नाहीत, याची खातरजमा भाजपा-राष्ट्रवादीने केली आहे. खातेवाटपासाठी मतदान झालेच तर भाजपा-राष्ट्रवादी आघाडीच्या सदस्यांना पसंतीक्रमानुसार मतदान कसे करायचे? याबाबत माहिती देण्याची तयारी भाजपा-राष्ट्रवादीने केल्याचे समजते. पंधरा दिवसांतच अध्यक्ष व उपाध्यक्ष पदानंतर महत्त्वाच्या समित्या विरोधकांच्या ताब्यात गेल्याने शिवसेना-कॉँग्रेसमध्ये अस्वस्थता असल्याचे समजते. त्याचाच एक भाग म्हणून आधीप्रमाणेच आताही भाजपाला कमी महत्त्वाची समिती देऊन महत्त्वाच्या समित्या ताब्यात घेऊन सत्तेवर अंकुश ठेवण्याचा शिवसेना - कॉँग्रेस युतीचा मानस असल्याचे कळते. (प्रतिनिधी)
शिवसेनेने ताणल्यास भाजपाजि.प. विषय समिती निवडणूक
By admin | Published: April 14, 2017 11:12 PM