लोकमत न्यूज नेटवर्कनाशिकरोड : नाशिकरोड देवळाली व्यापारी बँक संचालक मंडळाच्या निवडणुकीत श्री व्यापारी पॅनलचे नेतृत्व स्वीकारत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी अखेर निवडणुकीत उडी घेतल्याने माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड व जिल्हाप्रमुख विजय करंजकर हे आमने-सामने आले आहेत. त्यामुळे यंदा व्यापारी बँकेची निवडणूक चांगलीच चुरशीची होईल, असे चित्र दिसू लागले असून, शिवसेनेतील राजकारणालादेखील कलाटणी मिळणार आहे.नाशिकरोड देवळाली व्यापारी बँक संचालक मंडळाच्या २१ जागांसाठी येत्या २५ जून रोजी मतदान होणार आहे. सत्तारूढ सहकार पँनलचे नेतृत्व शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड व राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते निवृत्ती अरिंगळे करत आहे. गेल्या निवडणुकीत प्रतिस्पर्धी श्री व्यापारीचे सहा संचालक निवडून आले होते. त्यापैकी संचालक अशोक सातभाई यांनी श्री व्यापारी पॅनलला रामराम ठोकत सहकार पॅनलमध्ये प्रवेश केला आहे.सहकार पॅनलचे बहुतांश उमेदवार निश्चित असून, गेल्या ८-१0 दिवसांपासून त्यांनी प्रचाराला सुरुवात करत सभासदांच्या व विविध समाजाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली आहे. तर श्री व्यापारी पॅनलच्या संचालकांनी पॅनलची मोट बांधण्यासाठी काम केले. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर हे निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतात की नाही तसेच कोणत्या पॅनलच्या पाठीशी उभे राहतात, यावर गेल्या काही दिवसांपासून चर्चेला उधाण आले होते. मात्र रविवारी दुपारी करंजकर यांनी श्री व्यापारी पॅनलचे नेतृत्व स्वीकारत निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली. गेल्या १५ वर्षांपासून शिवसेनाही सहकार पॅनलच्या सोबत होती. मात्र यंदा जिल्हाप्रमुख करंजकर यांनी श्री व्यापारी पॅनलचे नेतृत्व स्वीकारल्याने सहकार पॅनलचे नेते शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड हे समोरासमोर उभे ठाकले आहेत. यामुळे व्यापारी बँक निवडणूक रंगणार आहेच. शिवाय शिवसेनेतील राजकारणदेखील ढवळून निघणार आहे.दुर्गा उद्यान समोरील श्री व्यापारी पॅनलच्या कार्यालयात विजय करंजकर, राजू लवटे, राजू टर्ले, हेमंत गायकवाड, सतीश मंडलेचा यांच्या उपस्थितीत इच्छुक उमेदवार व कार्यकर्त्यांची बैठक झाली. बैठकीत विविध विषयांवर चर्चा करून मंगळवारी सकाळी भगूरच्या श्री रेणुका माता मंदिरात श्री पॅनलच्या प्रचाराचा नारळ फुटणार आहे. बँकेतील एकाधिकारशाही बंद करण्यासाठी श्री व्यापारी पॅनल निवडणूक लढवित असल्याचे करंजकर यांनी यावेळी सांगितले. बैठकीला नगगरसेवक रमेश धोंगडे, प्रशांत दिवे, अॅड. सुनील बोराडे, अॅड. मुकुंद आढाव, चंद्रकांत विसपुते, शंकरशेठ धनवटे, विलास पेखळे, गंगाधर उगले, शांताराम घंटे, प्रकाश गोहाड, शिरीष लवटे, कन्नू ताजणे, योगेश नागरे, विक्रम खरोटे, सुदाम ताजनपुरे, श्याम गोहाड, संदीप कर्नावट, अजित गायकवाड, रमेश पाळदे आदि उपस्थित होते.
शिवसेनेचे आजी-माजी जिल्हाप्रमुख आमने-सामने
By admin | Published: June 05, 2017 1:04 AM