नाशिक : गेल्या विधानसभा निवडणुकीत शहरातील तिन्ही मतदार संघावर भाजपाने बाजी मारल्याने त्याचा वचपा काढण्यासाठी शिवसेनेने शहरातील तिन्ही मतदार संघावर लक्ष केंद्रीत करण्याचे ठरविले असून, त्यासाठी पक्षापासून काही कारणास्तव दूरावलेल्या माजी शाखा प्रमुख, पदाधिकारी, माजी नगरसेवक अशांना जवळ करण्यासाठी प्रत्येक मतदार संघात‘मिसळ पार्टी’चे आयोजन करण्यावर शनिवारी संपर्क प्रमुखांनी शिक्कामोर्तब केले. पश्चिम मतदार संघात झालेल्या ‘मिसळ पार्टी’च्या निमित्ताने पक्षांतर्गंत गटबाजीला यापुढे थारा नको असा सल्लाही त्यांनी दिला आहे.शनिवारी सातपुरच्या एका लॉन्सवर पश्चिम म्हणजेच सिडको-सातपुर मतदार संघातील शिवसैनिकांसाठी ‘मिसळ पार्टी’चे आयोजन करण्यात आले होते. दोन दिवसांपुर्वी नाशिक भेटीवर येवून गेलेल्या उत्तर महाराष्टÑ संपर्क प्रमुख खासदार संजय राऊत यांनी ‘मिसळ पार्टी’ला कार्यकर्ते पक्षाशी जोडण्याची जोड देवून त्याचे कौतुक केले होते व अशा पार्टीला आपण स्वत: उपस्थित राहणार असल्याचे जाहीर केल्याने शनिवारच्या मिसळ पार्टीला संजय राऊत यांच्यासह जिल्हा संपर्क नेते आमदार अजय चौधरी हे देखील उपस्थित होते. या मिसळ पार्टीच्या निमित्ताने शिवसेनेने विधानसभा व लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केल्याचे मानले जात असून, त्याची सुरूवात १९८२ पासून शिवसेनेत सक्रीय असलेले परंतु विविध कारणास्तव पक्षापासून दूर गेलेल्या माजी शाखाप्रमुख, पदाधिकारी, माजी नगरसेवकांची मनधरणी करण्यात आली आहे. साधारणत: दिडशेहून अधिक जुने, निष्ठावंत शिवसैनिकांची यादी तयार करून त्यांना ‘मिसळ पार्टी’चे घरपोच निमंत्रण देण्यात आले व त्यांना शनिवारच्या मिसळ पार्टीत आदराचे स्थान देण्यात आले. काही कारणास्तव पक्षापासून दुरावले असलेले किंवा गटबाजीमुळे दूर गेलेल्यांचा सत्कारही यावेळी पक्ष नेत्यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी बोलताना खासदार राऊत यांनी, महापालिका निवडणुकीत काय झाले ते विसरून व झालेल्या पराभवाची कारणमिमांसा करण्यापेक्षा आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला आत्तापासूनच लागण्याचे आवाहन केले. लोकांचा विश्वास संपादन करण्यासाठी त्यांच्यात मिसळा व त्यांनी कामे करा असा सल्ला देवून ‘मिसळ पार्टी’ही मनोमिलनासाठी उपयुक्त असून, त्यात गटबाजीला थारा नको, प्रत्येक मतदार संघात असा उपक्रम राबविला जावा व अशा पार्टीला आपण स्वत: उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी सागिंतले. यावेळी आमदार चौधरी यांनीही मार्गदर्शन केले. आगामी काळात नाशिक मध्य, नाशिक पुर्व या मतदार संघात ‘मिसळ पार्टी’चे आयोजन करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
शिवसेनेची ‘मिसळ’ पार्टी सर्वच मतदार संघात !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 6:07 PM
शनिवारी सातपुरच्या एका लॉन्सवर पश्चिम म्हणजेच सिडको-सातपुर मतदार संघातील शिवसैनिकांसाठी ‘मिसळ पार्टी’चे आयोजन करण्यात आले होते. दोन दिवसांपुर्वी नाशिक भेटीवर येवून गेलेल्या उत्तर महाराष्टÑ संपर्क प्रमुख खासदार संजय राऊत यांनी ‘मिसळ पार्टी’ला कार्यकर्ते पक्षाशी जोडण्याची जोड देवून त्याचे कौतुक केले होते
ठळक मुद्देभाजपाला शह : जुन्या पदाधिका-यांना आणणार प्रवाहातमाजी शाखाप्रमुख, पदाधिकारी, माजी नगरसेवकांची मनधरणी करण्यात आली