सिन्नर : येत्या १९ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर शिवसेनेकडून काढण्यात येणाऱ्या मोर्चाला जास्तीत जास्त शिवसैनिकांनी उपस्थितीत राहावे या नियोजनासाठी जिल्हा व तालुका पदाधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधींनी सिन्नर तालुक्यातील गावोगावात बैठका घेण्यास प्रारंभ केला आहे. बुधवारी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर, आमदार योगेश घोलप, आमदार राजाभाऊ वाजे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख दीपक खुळे यांच्यासह शिवसेना पदाधिकाऱ्यांनी नायगाव व मुसळगाव जिल्हा परिषद गटात दौरा केला. गावोगावी शिवसैनिकांच्या बैठका घेऊन जागृती केली. नाशिक जिल्ह्णावर भाजपाकडून अन्याय केला जात असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. जिल्ह्णाबाहेरील धरणांमध्ये पाणी सोडणे, एकलहरा प्रकल्प व आरोग्य विज्ञान विद्यापीठ स्थलांतरणाचा घाट, उद्योगांना जास्त दराने वीज, अनुदान वाटप याबाबत जिल्ह्णावर अन्याय केला जात असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. शनिवार दि. १९ मार्च रोजी आयोजित करण्यात आलेल्या मोर्चात जास्तीत जास्त शिवसैनिकांनी सहभागी होण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. २ ते ७ मार्चपर्यंत प्रत्येक गटात जावून गावोगावी शिवसैनिकांच्या बैठका घेतल्या जाणार आहेत.या दौऱ्यात सोमनाथ तुपे, पिराजी पवार, गणेश आव्हाड, विक्रम कातकाडे, कृष्णा कासार यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी सहभागी झाले होते. (वार्ताहर)
मोर्चा नियोजनासाठी शिवसेनेचा तालुका दौरा
By admin | Published: March 02, 2016 11:11 PM