पिंपळगाव बसवंत : एसटी महामंडळाच्या शिवशाही बस सुरक्षित नसल्याबाबत कुप्रसिद्ध असतानाच नंदुरबार आगाराच्या पुणे-नंदुरबार या बसच्या चालकाने बस मध्येच थांबवत मद्यपानाचा आस्वाद घेण्याचा पराक्रम दाखविला आहे. पहाटेच्या सुमारास सर्व प्रवासी निद्राधीन असताना या चालकाने ही मद्यपार्टी केल्याने वडनेर पोलीस ठाण्यात संबंधित चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे शिवशाही बसवरील नियुक्त चालकांचा मनमानी कारभार चव्हाट्यावर आला आहे.नाशिक कडून नंदुरबार च्या दिशेने जाणारी (क्रमांक एम. एच १८ बी.जे २२५६) नंदुरबार आगाराची पुणे-नंदुरबार ही बाफना-अय्यर यांची खाजगी शिवशाही बस चांदवड तालुक्यातील सोग्रस फाटा येथे चांदवड पहाटे साडेचार वाजेपासून सकाळी सहा वाजेपर्यंत उभी होती. पहाटेची वेळ असल्यामुळे बसमधील प्रवासी झोपले होते. त्यामुळे बस थांबल्याचे कुणाच्या लक्षात आले नाही. परंतु दीड तासानंतर प्रवाशांना बस थांबल्याचे निदर्शनास आले. त्यांनी चालकाला जाब विचारला असता, सदर चालक बिसरली बाटलीतील पाणी पिताना आढळून आला. प्रवाशांनी त्याला विचारणा केली परंतु, सदर चालक हा बिसलरी बाटलीत दारू ओतून सेवन करत असल्याचे लक्षात आले. मद्यपानासाठी या पठ्ठयाने गाडी मध्येच थांबविण्याचा पराक्रम केला. याबाबत प्रवाशांनी एसटी महामंडळ आणि नंदुरबार आगाराबाबत नाराजी व्यक्त केली आणि संबंधित चालकावर कारवाईची मागणी केली. यावेळी पोलिसांनाही पाचारण करण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी येऊन वस्तुस्थिती जाणून घेतली आणि चालक चेतन कैलास पाटील यांच्या विरोधात वडनेर पोलीस ठाण्यात गुन्'ाची नोंद करण्यात आली. पुढील तपास वडनेर पोलीस उपनिरीक्षक कैलास इंदेकर करत आहेत.
शिवशाही मध्येच थांबवून चालकाचे मद्यसेवन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2018 6:46 PM
गुन्हा दाखल : सोग्रस फाट्यावर घडला प्रकार
ठळक मुद्दे मद्यपानासाठी या पठ्ठयाने गाडी मध्येच थांबविण्याचा पराक्रम केला. याबाबत प्रवाशांनी एसटी महामंडळ आणि नंदुरबार आगाराबाबत नाराजी व्यक्त केली आणि संबंधित चालकावर कारवाईची मागणी केली.