ओझरटाऊनशिप : ओझर येथील जगदगुरु जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज आश्रमातील प्रसिद्ध ‘जनशांती धाम’ मध्ये शेकडो भाविकांच्या हस्ते १०८ शिवलिंगाची तसेच १०८ गोमुखांची प्राणप्रतिष्ठा मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. हा शिवोत्सव सोहळा विविध कार्यक्र मांच्या आयोजनेने अविस्मरणीय ठरला. महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत गुढीपाडव्यापासून जपानुष्ठान, यज्ञ, अखंड नंदादीप, यांसह भरगच्च कार्यक्र म सुरू आहेत. याच कार्यक्र मांतर्गत आश्रमातील प्रसिद्ध ‘जनशांती धाम’ मध्ये १०८ शिवलिंग तसेच १०८ गोमुखांची शेकडो सपत्निक भाविकांच्या हस्ते ब्रम्हवृंदाच्या मंत्राघोषात प्राणप्रतिष्ठा संपन्न झाली. यावेळी १०८ भाविकांच्या हस्ते हवन संपन्न झाले.श्रमदान, अन्नदान, वस्त्रदान, धान्य प्रसाद वाटप देखील करण्यात आले. यावेळी स्वामी शांतिगिरी महाराजांनी शिवलिंग आणि गोमुख प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास बसलेल्या भाविकांच्या भाग्याचे वर्णन करत प्राणप्रतिष्ठेस बसणाऱ्या भाविकांचा गौरव केला. प्रत्येक मनुष्याच्या जीवनात शिव भक्ती आवश्यक असल्याचे स्वामीजींनी सांगितले.यावेळी संपूर्ण आश्रम शिवभक्तीमय झाला होता.कार्यक्रमाचे पौरोहित्य वेदशास्त्र संपन्न विलास कुलकर्णी यांनी केले.
ओझरच्या ‘जनशांती धाम’मध्ये शिवोत्सव सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 2:21 PM