सातपूर : शिवसमर्थ कला, क्रीडा मंडळ, महानगरपालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या सहा वर्षांपासून गणपती विसर्जनाची योग्य ती काळजी घेण्यात येत असल्याने नदीपात्राचे प्रदूषण रोखण्यात यश आले असून, सहा वर्षांत एकही जीवितहानी झाली नसल्याचे गटनेता विलास शिंदे यांनी सांगितले. सहा वर्षांपूर्वी गंगापूर धरण आणि सोमेश्वर धबधबा याठिकाणी अनेकांचे मूर्ती विसर्जन करताना बळी गेले होते; मात्र त्यानंतर मंडळाने स्वयंसेवक नेमण्याची व्यवस्था केल्याने दुर्घटना टाळण्यात यश आले आहे. नगरसेवक विलास शिंदे यांच्या शिवसमर्थ मंडळाच्या माध्यमातून सोमेश्वर धबधबा येथे भाविकांना प्रसाद वाटप करण्यात आले. गोदावरी नदीपात्रात मूर्ती विसर्जित न करता तीन हजारांहून अधिक मूर्तींचे संकलन करण्यात आले. पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल, विभागीय अधिकारी निर्मला गायकवाड उपस्थित होते.सहा हजार मूर्ती संकलितगणेश विसर्जनाच्या औचित्यावर पर्यावरणपूरक उत्सव आणि गोदा प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेला विविध सामाजिक-शैक्षणिक व पर्यावरणप्रेमी संघटनांनी हातभार लावला. गोदाकाठावर क. का. वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या स्वप्नपूर्ती फाउंडेशन व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने गोदाकाठावर गणेशमूर्तींचे संकलन करण्यात आले. दिवसभरात सहा हजारांहून अधिक मूर्ती संकलन करण्यास विद्यार्थ्यांना यश आले. या उपक्रमाचे फाउंडेशनचे चौथे वर्ष होते. सुमारे दोनशे स्वयंसेवकांनी उपक्रमात सहभागी होत परिश्रम घेतले. संकलित करण्यात आलेल्या बाप्पाच्या मूर्तींची सुरक्षितरीत्या हाताळणी करत वाहनात काळजीपूर्वक ठेवण्यात आल्या. स्वप्नपूर्ती फाउंडेशन संस्थेकडून शैक्षणिक सामाजिक उपक्रम राबविले जातात. ग्रामीण भागात जाऊन तेथील शाळांमधील विद्यार्थ्यांना संगणकीय ज्ञानदान करणे हा या संस्थेचा मुख्य उपक्रम आहे.
शिवसमर्थ, स्वप्नपूर्तीने केले मूर्ती संकलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2018 12:28 AM