संजय पाठक, नाशिक- शिवसेनेच्या उद्धव सेनेचे माजी उपनेते आणि माजी समाज कल्याण मंत्री बबनराव घोलप यांनी काही दिवसांपूर्वी शिर्डी लोकसभा मतदार संघाच्या राजकारणावरून पक्षाचा राजीनामा दिला होता. ते आज शिंदे सेनेत प्रवेश करणार असून दुपारी चार वाजता मुंबईत हा प्रवेश सोहळा होणार आहे.
नाशिकरोड देवळाली मतदार संघात तब्बल पाच वेळा आमदारकी भूषवणाऱ्या बबनराव घोलप यांना राज्यात युतीची सत्ता असताना समाज कल्याण मंत्री पद देण्यात आले होते त्यानंतर त्यांचे पुत्र योगेश घोलप हे या मतदारसंघात आमदार होते दरम्यान घोलप यांना शिर्डी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी हवी होती त्यानुसार उद्धव ठाकरे यांनी त्यांना शिर्डीचे संपर्क मंत्री पदही दिले होते.
मात्र, मध्यंतरी भाऊसाहेब वाकचौरे यांना पक्षात प्रवेश देण्यात आला आणि त्यामुळेच आपली उमेदवारी धोक्यात आल्याचे कळल्यावर घोलप यांनी आधी उपनेते पदाचा आणि नंतर पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता.
भाजपा किंवा शिंदे सेनेत आपण प्रवेश करू असे संकेत घोलप यांनी यापूर्वीच दिले होते मात्र आता ते शिंदे सेनेत प्रवेश करणार असून दुपारी चार वाजता हा सोहळा मुंबईत होणार आहे असे शिंदे सेनेचे नाशिक महानगर प्रमुख प्रवीण तिदमे यांनी सांगितले.