नाशिक : कोरोना संसर्ग टाळण्यासाठी सुरक्षित अंतर पथ्याचे पालन करण्याचे आदेश देऊनही त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या दुकानदारांवर महापालिकेच्या पथकांनी धडक कारवाई केली. त्यामुळे धावपळ उडाली. केवळ सुरक्षित अंतराच्या नियमाचे पालन न करणाऱ्या दुकानदारांकडून २५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला असून, मास्क न लावणाऱ्यांकडून ३८ हजार रुपयांहून अधिक दंड वसूल करण्यात आला आहे.
महापालिकेच्या पश्चिम विभागाच्या पथकाने सीबीएस आणि शिवाजी रोड परिसरात अनेक दुकानांना भेटी दिल्या. ज्या ठिकाणी गर्दीमुळे सुरक्षित नियमांचे पालन होत नाही, अशा तीन दुकानदारांवर धडक कारवाई करून प्रत्येकी पाच हजार रुपये याप्रमाणे पंधरा हजार रुपयांचा दंड वसूल केला. विभागीय अधिकारी जयश्री सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता निरीक्षक राजू गायकवाड, अशोक साळवे, सोमनाथ वाघ यांनी ही कारवाई केली.नाशिक पूर्व विभागात दोन जणांकडून दहा हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.याशिवाय नाशिक शहरात नाशिक रोड विभागात ४३ प्रकरणांत ८ हजार रुपये, पंचवटी विभागात ३६ जणांकडून ७ हजार २०० रुपये, सिडको विभागात ५५ जणांकडून ११ हजार रुपये तर सातपूर येथे २० जणांकडून चार हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. अशाप्रकारे एकूण ३८ हजार ८०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती घनकचरा विभागाच्या संचालक डॉ. कल्पना कुटे यांनी दिली.