नाशिक : येथील अंबड पोलीस ठाणे हद्दीतील औद्योगिक वसाहतीतील एक्स्लो पॉइंट येथे शिवसेना नगरसेवक भागवत आरोटे यांच्या भावाच्या कारचा अपघात झाला. यावेळी आरोटे व भाजपचे नगरसेवक राकेश दोंदे यांनी घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत पोलीसही घटनास्थळी दाखल जालेले होते. यावेळी संशयित आरोटे व दोंदे यांनी कर्तव्य बजावत असलेले पोलीस कर्मचारी विष्णू गावित यांना धक्काबुक्की करून बेदम मारहाण करत गळा दाबण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी (दि.२८) मध्यरात्रीच्या सुमारास घडला. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात रात्री उशिरा जीवे ठार मारण्याचा प्रयत्न व सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी सोमवारी (दि.२९) सकाळी दोघा संशयित नगरसेवकांना अटक केली आहे.एकीकडे कोरोना संक्रमणाच्या काळात मागील तीन महिन्यांपासून पोलीस रस्त्यावर उतरून दिवसरात्र एक करून ‘कोरोना योद्धा’म्हणून कर्तव्य बजावत आहे. त्यामुळे जनमानसाच्या मनात पोलिसांविषयी संवेदनशिलता आणि सहानुभूती असून पोलिसांच्या रूटमार्चच्या दरम्यान अनेक ठिकाणी पुष्पवृष्टीही नागरिकांकडून करण्यात आली. आरोग्य यंत्रणेच्या खांद्याला खांदा लावून शहरासह जिल्ह्यातील अन् संपुर्ण राज्यातील पोलीस यंत्रणा कोरोनाशी दोन हात करत झटत आहेत. एकूणच पोलिसांविषयीचा आदर समाजमनात अधिक वाढत असताना सिडको विभगातील दोघा नगरसेवकांकडून थेट ‘खाकी’वर हात उचलला गेल्याने संताप व्यक्त होत आहे. लोकप्रतिनिधी म्हणून समाजात वावरणाऱ्यांकडून असे गुन्हेगारी स्वरूपाचे कृत्य मुळात अपेक्षित नाही. यामुळे जनसामन्यांमध्ये लोकप्रतिनिधींची प्रतिमा मलीन होण्यास पुरेसा वाव मिळतो.दरम्यान, अंबड पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या या संतापजनक घटनेचा शहर व परिसरातून निषेध व्यक्त होत आहे. अंबड पोलिस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाचे निरिक्षक कमलाकर जाधव यांच्या पथकाने या गुन्ह्यात आरोटे व दोंदे यांच्यासह अमित आरोटे, अजय मिश्रा यांना अटक केली आहे. याप्रकरणी बीट मार्शल गावीत यांच्या फिर्यादीवरून अंबड पोलीस ठाण्यात आरोटे, दोंदे यांच्यासह सात संशयित हल्लेखोरांविरूध्द जीवे ठार मारण्याचा प्रयत्न व सरकारी कामात अडथळा व शिवीगाळ, दमबाजी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास उपनिरिक्षक मिथुन म्हात्रे हे करीत आहेत.