नाशिक : पाचही बोटे सारखी नसतात, हे खरे असले तरी एक व्यक्ती चुकीची वागली तर संपूर्ण क्षेत्र बदनाम होते, तेदेखील सत्य आहे. रिक्षाचालकांच्या बाबतीत असे नेहमीच घडत आले आहे. रिक्षाचालक बेशिस्त, उर्मट व उद्धटपणे वागतात, अशी सर्वसामान्यांची तक्रार असते. या तक्रारीचा अनेकदा बागुलबुवा केला जातो. असाच अनुभव सीबीएससारख्या सिग्नलवर कर्तव्य बजावत असताना वाहतूक शाखेच्या पोलिसांना आला. रिक्षाचालकांनी त्यांच्याशी अरेरावी करत थेट त्यांच्या ‘वर्दी’लाच हात घातल्याचा धक्कादायक प्रकार घडल्याने संताप व्यक्त होत आहे.घडलेला सविस्तर प्रकार असा, रिक्षाचालक संशयित गजानन प्रकाश दुधाडे (२१, रा. श्रमिकनगर) हा त्याची रिक्षा (एम.एच.१५, ई.एच ०५८६) घेऊन शुक्रवारी (दि.८) सायंकाळच्या सुमारास ‘फ्रंट सीट’ बसवून सीबीएस चौकात आला. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करण्याच्या नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्याची रिक्षा क र्तव्यावर असलेले वाहतूक पोलीस हवालदार द्वारिका परशुराम यादव (५०) यांनी थांबविली. त्याचा राग चालक दुधाडे याच्या शेजारी बसलेला रिक्षामालक स्वप्नील सुरेश गुरव याला आला. त्याने यादव यांच्याशी अरेरावी केली. त्यांच्या वर्दीची कॉलर धरत जोरात हिसका दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यामुळे त्यांच्या मानेला दुखापत केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान, हा वादविवाद सुरू असताना यादव यांच्या मदतीला कर्तव्यावर असलेले पोलीस शिपाई सोमनाथ गायकवाड यांनी धाव घेतलीअसता गुरव याने त्यांनाही न जुमानता दुधाडे यानेही वादात सहभागी होत गायकवाड यांच्या वर्दीवरील नावाची पाटी हिसका देत तोडून शासकीय कामात अडथळा आणल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुरव व दुधाडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.----रिक्षाचालक सगळेच गुंडप्रवृत्तीचे आहे, असे मुळीच नाही. त्यामुळे पोलिसांकडून सर्वच रिक्षाचालक ांना धारेवर धरले जाणार किंवा जाते, असेही नाही. मात्र ज्या रिक्षाचालकांनी अशाप्रकारे वर्तन केले आहे, त्यांच्याविरुद्ध निश्चितच कायदेशीर कठोर कारवाई केली जाईल. सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस असो किंवा सर्वसामान्य नागरिक कोणासोबतही रिक्षाचालकांनी उर्मटपणे वागणे व अरेरावी करणे योग्य नाही. रिक्षाचालकांची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासून कारवाई करण्याची मोहीम नियमित सुरू आहे.- लक्ष्मीकांत पाटील, उपआयुक्त, शहर वाहतूक शाखा
धक्कादायक : वाहतूक पोलिसांच्या वर्दीवर रिक्षाचालक-मालकाने घातला हात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2019 4:52 PM
सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुरव व दुधाडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.
ठळक मुद्देसरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला ‘वर्दी’लाच हात घातल्याचा धक्कादायक प्रकार