- अझहर शेखनाशिक - येथील नाशिकरोड भागातील एका कुटुंबातील आठ महिन्यांच्या बाळाने घरात खेळताना हाती लागलेले नेलकटर चक्क गिळले. बाळाला त्रास होऊ लागल्याची बाब वेळीच आईच्या लक्षात आल्याने तातडीने बाळाला घेऊन जिल्हा शासकीय रुग्णालय गाठले. तेथे तपासणी केल्यानंतर तेथून आडगाव येथील मविप्र वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले. सोमवारी (दि.१९) रात्री उशिरापर्यंत बाळावर शस्त्रक्रिया करण्यात आली. डॉक्टरांनी यशस्वीपणे सुरक्षित नेलकटर बाहेर काढले.
नाशिकरोड येथील शिंदे कुटुंबातील चिमुकल्याने सोमवारी दुपारी घरात खेळताना नेलकटर गिळले होते. ही धक्कादायक बाब बाळाच्या आईच्या वेळीच लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला. सुदैवाने डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश आले. वैद्यकीय महाविद्यालयात उशिरापर्यंत चाललेल्या अत्यंत अवघड व गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी झाली. बाळाची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. कुटुंबातील सदस्यांच्या विंनतीमुळे बाळाचा नामोल्लेख टाळण्यात आला आहे.
जिल्हा रुग्णालयाची असमर्थताजिल्हा शासकीय रुग्णालयात नाशिकरोडचे हे कुटुंब बाळाला घेऊन सर्वप्रथम आले होते. रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी वर्गाने तपासणी केली असता शस्त्रक्रिया अशक्य असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर तेथून मुलाला आडगाव येथील वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय कुटुंबातील प्रमुखांनी घेतला. तेथे रात्री यशस्वीपणे शस्त्रक्रिया करून बाळाच्या घशात अडकलेले नीलकटर काढण्यात डॉक्टरांना यश आले. जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय सूत्रांनी अशा गंभीर अवस्थेत असलेल्या रुग्णावर उपचार करण्यास असमर्थता दर्शविली यामुळेआश्चर्य व्यक्त केले जात आहे.