भगवान गायकवाड, दिंडोरी (नाशिक): नववर्षाच्या पहिल्याच दिवशी दिंडोरी तालुक्यातील ननाशी येथे दाक्षिणात्य सिनेमा स्टाईलने पिता पुत्राने कुऱ्हाड कोयत्याने शेजाऱ्याचे शिर धडावेगळे करत शिर व कुऱ्हाड घेऊन पोलीस स्टेशनला हजर झाल्याने परिसरात घबराट पसरली आहे.
मागील दोन वर्षांपूर्वी मुलीचे लग्न मोडण्यास व आता मुलगी सासरहून बेपत्ता झाली यास मयत जबाबदार असल्याचे संशयावरून वाद होत हा खून झाल्याची प्रार्थामिक चर्चा असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, ननाशी येथील गुलाब रामचंद्र वाघमारे व सुरेश बोके हे शेजारी शेजारी राहतात. त्यांच्यात गेल्या दोन वर्षांपासून वाद होते. त्यात मुलीचे ठरलेले लग्न मोडले. यावरून वाद होत होता. मुलगी सासरहून बेपत्ता झाली. त्यास ही गुलाब जबाबदार असल्याचा संशय सुरेश बोके यांना येत त्यांचेत ३१ डिसेंबरला वाद झाला.
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी सर्व जण नव वर्षाचे स्वागत अन् एकमेकांना शुभेच्छा देत असताना वाघमारे व बोके यांचे वाद उफाळून आला. यावेळी सुरेश बोके व त्यांचा मुलगा विशाल बोके यांनी थेट कुऱ्हाड कोयत्याने गुलाब वाघमारे यांच्या मानेवर हल्ला करत शिर धडावेगळे केले अन कुऱ्हाडीसह शिर घेऊन पोलीस ठाणे गाठले.
दरम्यान, घटनेची माहिती पेठ पोलीस ठाण्यात मिळताच पोलिसांचा फौज फाटा ननाशी येथे दाखल होत बंदोबस्त वाढवण्यात आला. परिसरात खळबळ उडत गावात घबराटीचे वातावरण पसरले. पोलिसांनी दोघा पिता पुत्रांना अटक करत तपास सुरू केला आहे.