- अझहर शेखनाशिक : राज्यभरात बिबट्यांची संख्या जास्त असल्याचे प्रथमदर्शनी दिसत असले तरी मार्जार कुळातील चपळ बिबट्याचे अस्तित्व धोक्यात आल्याची वस्तुस्थिती आहे. आठ वर्षांमध्ये राज्यभरात सुमारे ६०० बिबट्यांचा मृत्यू झाला. चालू वर्षाची स्थिती भयावह असून, सुरुवातीच्या दोन महिन्यांत २५ पेक्षा अधिक बिबटे विविध भागात मरण पावले आहेत. शिकारीचे प्रमाण जरी कमी असले तरी त्यांच्या नैसर्गिक आणि अपघाती मृत्यूचे प्रमाण वाढल्याचे आकडेवारीवरून दिसते.नाशिक, अहमदनगर, पुणे, जळगाव, धुळे, नागपूर जिल्ह्यांमध्ये बिबट्यांची संख्या बऱ्यापैकी आढळते. अलीकडे जंगलतोड वाढल्याने बिबट्याने शेतीचा आश्रय घेण्यास सुरुवात केली अन् मानव-बिबट संघर्ष वाढला. ऊसशेती बिबट्यासाठी सुरक्षित अधिवास ठरतो.बिबट्या केवळ ग्रामीण भागात राहतो असे नाही, तर ठाणे, मुंबई, पुण्याच्या जवळही वावरतो. चालू वर्षाची बिबट मृत्यूची आकडेवारी अद्याप वन मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आलेली नाही.नाशिकमध्ये ४५ बिबट्यांचा मृत्यूचार वर्षांमध्ये नाशिक जिल्ह्यात ४५ बिबट्यांचा मृत्यू झाला आहे. २०१६ आणि २०१७ साली प्रत्येकी १३, २०१८ मध्ये १४ तर यावर्षी बछड्यांसह किमान ५ ते ६ बिबट्यांचा मृत्यू झाला आहे.शिकारीचेवाढते प्रकारआठ वर्षांत ७५ बिबट्यांची शिकार केली गेली. यामध्ये १० बिबट्यांवर विषप्रयोग, २३ बिबटे फास लावून ठार मारले गेले. विजेच्या धक्क्याने ७ बिबटे, बंदुकीने ६ आणि अन्य संशयास्पद शिकारीच्या पद्धतीत २९ असे एकूण ७५ बिबटे शिकारीत मृत्युमुखी पडले आहेत.
धक्कादायक वास्तव : राज्यात आठ वर्षांत ६०० बिबट्यांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2019 6:42 AM