नाशिक : शहरात वाहनचालकांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत असून या उपद्रवाचा फटका सर्वसामान्यांसह आता पोलिसांनाही सहन करावा लागत आहे. नाशिकरोड पोलीस ठाणे हद्दीत अगदी पोलीस चौकीपासून हाकेच्या अंतरावर कर्तव्य बजावत असलेल्या एका शहर वाहतूक पोलिसाच्या डोक्यात वाहनचालकाने चक्क नारळ फोडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे शहरात वाहतूक पोलिसांसोबत वाहनचालकांकडून होणारे गैरवर्तन दिवसेंदिवस वाढत असल्याने संताप व्यक्त होत आहे.याबाबत मिळालेली माहिती अशी, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरूध्द कारवाई करण्यासाठी शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे कर्मचारी सुकदेव सदाशिव अहिरे कर्तव्यावर होते. यावेळी संशयित वाहनचालक रविंद्र दामोदर मोरे (४९ रा.गजानन पार्क सिन्नरफाटा) याचे वाहन अहिरे यांनी बुधवारी (दि.३१) रात्री आठ वाजेच्या सुमारास सिन्नर फाटा पोलीस चौकीच्या समोर नाकाबंदी दरम्यान रोखले. त्याचा राग मनात धरून मोरे याने स्वत:जवळील नारळ काढून थेट अहिरे यांच्या डोक्यात फोडून त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी या वाहनचालकाला बेड्या ठोकल्या आहेत. मोरे हा जवळच्या एका मंदिरात दर्शनासाठी चालला होता; मात्र बेशिस्त वाहतूक करत असल्याचे लक्षात येताच त्यास पोलिसाने रोखले. त्यावेळी त्याने ‘ तु माझी गाडी का अडविली, तुला काय अधिकार आहे’ अशी भाषा वापरून वाद घालत शासकिय कामात अडथळा निर्माण केला.काही दिवसांपुर्वीच अशाचप्रकारे शालिमार येथील वाहतूक पोलिसाला रिक्षामधून उतरलेल्या काही लोकांनी मारहाण केल्याची घटना घडली होती. पोलिसांसोबत असे गैरवर्तन घडू नये यासाठी, तांना बॉडी वॉर्न कॅमेरेदेखील पुरविण्यात आले आहे; मात्र तरीदेखील त्याचीही कुठलीही तमा बेशिस्त वाहनचालक बाळगत नसून दंडात्मक कारवाई करणाºया वाहतूक पोलिसांसोबत अरेरावी करत उध्दटपणे वागण्याचे प्रकार दिवसेंदिवस शहरात वाढत असल्याचे नाराजी व्यक्त केली जात आहे.
धक्कादायक : वाहतूक पोलिसाच्या डोक्यात चक्क फोडले नारळ !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2019 6:56 PM
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरूध्द कारवाई करण्यासाठी शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे कर्मचारी सुकदेव सदाशिव अहिरे कर्तव्यावर होते.
ठळक मुद्देपोलिसांनी वाहनचालकाला बेड्या ठोकल्या लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्याचा प्रयत्न केला