नाशिक ग्रामीण पोलिसांसमोर सेक्सटॉर्शनचा प्रकार आल्यामुळे ग्रामीण पोलिसांचे सायबर सेल सतर्क झाले आहे. सचिन पाटील यांनी सायबर सेलला सतर्क राहून अशा टोळीचा पर्दाफाश करण्याबाबत आदेशित केले आहे. तसेच ट्विटर, फेसबुकच्या माध्यमातून जनप्रबोधनात्मक पोस्टदेखील ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून व्हायरल करण्यात आली आहे. ग्रामीण भागात कुठेही अशाप्रकारे जर कोणाची आर्थिक फसवणूक झाली असेल तर त्यांनी निसंकोचपणे पोलीस अधीक्षक कार्यालयातील सायबर पोलिसांकडे येऊन तक्रार द्यावी. संबंधित तक्रारदार व्यक्तीची ओळख गोपनीय ठेवली जाणार असल्याचेही पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
सोशल मीडियाचे प्रत्येक ॲप्लिकेशन अत्यंत सतर्कतेने आणि प्रायव्हसी सेटिंग्ज योग्यपणे सक्रिय करून वापरण्यास प्राधान्य द्यावे, तसेच ॲप्लिकेशन डाऊनलोड करण्यापूर्वी योग्य ती पडताळणी अवश्य करून घ्यावी. व्हाॅट्सॲप, फेसबुक, इन्स्टाग्राम यांसारखे तसेच गुगलकडून हे ॲप्लिकेशन वापरता अचानकपणे अनोळखी डेटिंग ॲप्लिकेशनच्या दाखविल्या जाणाऱ्या जाहिरातींना बळी न पडता डेटिंग ॲपची जाहिरात ब्लॉक करावी आणि असे ॲप्लिकेशन तरुणांनी विरुद्धलिंगी आकर्षणापोटी अजिबात डाऊनलोड करू नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
---इन्फो---
अश्लीलता हाच केंद्रबिंदू
फेसबुक असो किंवा अन्य कोणतेही सोशल ॲप यावरून जर अनोळखी व्यक्ती आपल्याला मैत्रीची विनंती पाठवत असेल तर हे एक फसवणुकीचे जाळे फेकले गेले आहे आणि अश्लीलता हाच त्याचा केंद्रबिंदू समजून त्याकडे दुर्लक्ष करत असे मैत्रीचे प्रस्ताव धुडकावून लावण्याचा सल्ला सायबर तज्ज्ञांकडून दिला जात आहे. अनेकदा विरुद्धलिंगी आकर्षणापोटी तरुण किंवा तरुणी या जाळ्यात अडकून आपली आर्थिक फसवणूक करून घेण्यास कारणीभूत ठरतात. तुमच्याशी चॅटिंग किंवा व्हिडिओ कॉल करणारी व्यक्तीचा एकच उद्देश असतो तो म्हणजे ब्लॅकमेलिंग हे लक्षात घ्यायला हवे, असे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी सांगितले.
--इन्फो--
...तर वेळीच धोका ओळखा
सोशल मीडियावरील कोणत्याही ॲपद्वारे महिलेच्या नावाने मैत्रीचा प्रस्ताव आल्यास.
पुरुषांसोबत मैत्री झाल्यास कथित महिलेकडून अश्लील चाळे करण्याबाबत आणला जाणारा दबाव.
अनोळखी व्यक्तीकडून शारीरिक लोभाचे आमिष दाखविले गेल्यास.
महिलेच्या नावाने अकाउंट वापरणारे अनेकदा सायबर गुन्हेगारीतील पुरुष असतात.