नाशिक : मुंबईनाका भागात कालिका मंदिरामागील परिसरात एका व्यावसायिकाला जीवे ठार मारण्याची धमकी देत गुन्हेगारांकडून सातत्याने खंडणी मागण्याचा प्रकार सरू होता. व्यावसायिकाने खंडणी देण्यास नाकार दिल्याने गुंडाने व्यावसायिकाच्या व शेजारच्या दुकानांची तोडफोड केल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिस्ट्रीशिटर्स विशाल भगवान आढाव याने वारंवार जिवे ठार मारण्याची धमकी देऊन खंडणी मागितल्याची तक्रार धनंजय प्रभाकर शिगणे (४५) यांनी मुंबई नाका पोलीस ठाण्यात दिली आहे. संशयिताने ६ मार्चला शिगणे त्यांच्या ऑफीसच्या बाजूला उभे असताना कोयत्याचा धाक दाखवून त्यांच्याकडून हप्ता म्हणून दोन हजार रुपये घेतले. तसेच ८ मार्चला पुन्हा हप्ता म्हणून खंडणीची रक्कम वाढवून मागितली. मात्र शिंगणे यांनी रक्कम देण्यास नाकार दिल्याने संशयिताने त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी देत परिसरात दहशत पसरविण्यासाठी शिंगणे यांचे व शेजारच्या दुकानांची तोडफोड केली. तसेच ९ मार्चला शिंगणे यांच्या टेम्पोचीही तोडफोड केली. त्यामुळे त्रस्त झालेल्या शिंगणे यांनी ११ मार्चला मुंबईनाका पोलीस ठाणे गाठून संशयित विशाल भगवान आढाव याच्याविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाची चौकशी करीत आहेेत.
हिस्ट्रीशिटर्सकडून खंडणीसाठी दुकानांची तोडफोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2021 11:05 PM