नाशिक- एखाद्या रस्त्याच्या कामाचे स्थानिक महत्व किती असते ते नाशिक शहरातील स्मार्ट रोडवर असणारे व्यावसायिक, शिक्षण संस्था चालक वकील आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील नागरीकांना विचारा. अवघा १ किलो मीटरचा हा स्मार्ट रोड दीड वर्षापासून पुर्ण होत तर नाहीच उलट त्यावर अशोक स्तंभ परीसरात खोदून ठेवण्यात आले असल्याने नागरीक प्रचंड त्रस्त झाले आहेत. त्यामुळे या मार्गावरील एका व्यवसायिकाने चक्क खड्डा बुजेपर्यंत त्यांच्या दुकानातून ट्रॉफी खरेदी करणाऱ्यांना दहा टक्के सूट देण्याचा निर्णय जाहिर केला आहे.
पारस लोहाडे असे त्यांचे नाव आहे. त्यांचे अशोकस्तंभ परीसरात दुकान आहे. वर्ष दीड वर्षांपासून रस्त्याचे काम सुरू असल्याने मुळातच ते त्रस्त आहेत. त्यात अशोकस्तंभावरून वकीलवाडीकडे जाणा-या मार्गावर भले मोठे खोदकाम करून ठेवण्यात आले आहे. सरकारी काम आणि सहा महिने थांब अशी आपल्याकडे म्हण आहे. परंतु स्मार्ट रोडचे हे काम कधी पुर्ण होणार हे सांगण्याचे धाडस स्मार्ट सिटी कंपनी करूच शकत नाही इतकी अनागोेंदी आहे. त्यातच खड्डा करून कंपनीने त्रास आणखीनच वाढविला आहे. त्याकडे लक्ष वेधण्यासाठी पारस लोहाडे यांनी थेट पंतप्रधा नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवले आहे. स्मार्ट सिटी प्रोजेक्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प असल्याने त्यांना खड्डा बुजवावा यासाठीच साकडे घातले आहे. परंतु त्याकडूनही दाद न मिळल्याने पारस लोहाडे यांनी त्यांच्या दुकानातून विविध स्पर्धांमध्ये पुरस्कार देण्यासाठी वापरण्यात येणा-या ट्रॉफींची खरेदी केल्यास दहा टक्के घसघशीत सुट देण्याचा निर्णय जाहिर केला आहे.
स्मार्ट सिटीरोडवरच सीबीएस परीसरात एका व्यवसायिकाने आम्ही अक्षरश: स्मार्ट रोडवर रस्त्यावर आलो आहोत, अशा प्रकारचा उपरोधीक फलक लावला आहे. त्यानंतर आता या रस्त्यावरील खडड्याची खिल्ली उडविणारा दुसरा फलक लावण्यात आला आहे.