नाशिक : शासनाने पूरग्रस्तांना रेशन दुकानदारांमार्फत मोफत अन्नधान्य पुरविण्याचा निर्णय घेऊन धान्य उपलब्ध करून दिले असले तरी, शासकीय गुदामातून धान्य उचलून वाहनात ठेवण्यासाठी हमालांकडून पैशांची मागणी होत असल्याने त्याचा आर्थिक फटका रेशन दुकानदारांना बसला असून, यासंदर्भात पुरवठा खात्याने कानावर हात ठेवले आहेत. दोन आॅगस्ट रोजी गोदावरीसह अन्य नद्या, नाल्यांना आलेल्या पुरामुळे नदीकाठच्या हजारो कुटुंबांना त्याची झळ पोहोचली. अनेकांच्या संसारोपयोगी वस्तू, अन्नधान्य, कपडेलत्ते पुराच्या पाण्यात वाहून गेले, तर काहींच्या घरांची पडझड झाली. अशा पूरग्रस्त सुमारे ६३३७ कुटुंबाना प्रत्येकी वीस किलो धान्य देण्याचा निर्णय शासनाने सोमवारी घेऊन मंगळवारी त्याचे वाटपही सुरू केले. रेशन दुकानदारांमार्फत सदरचे धान्य वाटप केले जाणार असून, त्यातून त्यांना काहीही आर्थिक लाभ होणार नाही. सेवाभावी वृत्तीने सदरचे काम करण्यास तयार असलेले दुकानदार शासकीय धान्य गुदामातील धान्य ताब्यात घेण्यासाठी गेले असता, गुदामातून बाहेर काढलेले धान्याचे कट्टे वाहनात उचलून टाकण्यासाठी प्रती कट्यामागे तीस रुपयांची मागणी हमालांकडून करण्यात आली. मुळात शासनाचे मोफत धान्य वाटप करणाऱ्या दुकानदारांना त्यातून काहीएक कमाई नसताना वरून भुर्दंड बसला. काही दुकानदारांनी याबाबत गुदाम व्यवस्थापकाकडे तक्रार केली, परंतु त्यांनी त्याची दखल घेतली नाही. शासनानेच थेट दुकानापर्यंत धान्य पोहोचविण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी करीत काही दुकानदारांनी धान्य उचलण्यास नकार दिला. (प्रतिनिधी)
पूरग्रस्तांच्या मदतीचा रेशन दुकानदारांना फटका
By admin | Published: September 02, 2016 12:47 AM