नाशिक : रेडझोनमध्ये असतानादेखील शहरातील दुकाने सुरू करण्यास जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली खरी, परंतु पोलीस यंत्रणेने शहरात अनेक भागात दुकाने सुरू करण्याची परवानगी आहे काय? असा प्रश्न करीत थेट व्यवसायवर बंदी केली. त्यामुळे संपूर्ण शहरात दुकाने सुरू करायची की नाही याबाबत प्रश्न निर्माण झाला. जिल्हाधिकाऱ्यांनी सुधारित आदेश काढून संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न केला असला तरी बुधवारी (दि.६) पुन्हा दोन दिवस सुरू असलेल्या घोळाचीच पुनरावृत्ती झाली आणि प्रशासकीय पातळीवरील विसंवाद यानिमित्ताने उघड झाला.विशेष म्हणजे रविवारपेठेसह ज्या भागात दुकाने सुरू झाली त्याठिकाणी फिजिकल डिस्टन्सिंगचा अक्षरश: फज्जा उडला. त्यामुळे अनेक ठिकाणी पोलिसांना नागरिकांना हुसकावे लागले. तर दुसरीकडे अनेक ठिकाणी जिल्हा प्रशासनाने परवानगी दिल्याचे सांगणाºया दुकानदारांना पोलिसांनी दरडावले. पोलिसांशी वाद करून अकारण गुन्हे दाखल होण्याच्या भीतीने अखेरीस व्यावसायिकांनी माघार घेतली, तर अनेक ठिकाणी सायंकाळीच दुकाने बंद करण्यात आली. शासकीय यंत्रणेच्या घोळामुळे व्यापारी वर्र्गाने नाराजी व्यक्त केली असून, पोलीस आणि जिल्हा प्रशासनातील असमन्वयाचा गोंधळ दूर करावा, अशी मागणी केली आहे.गेल्या २३ मार्चपासून शहरातील दुकाने आणि सर्वच खासगी आस्थापना बंद आहेत. त्यामुळे व्यापारी वर्ग मेटाकुटीला आला आहे. आज उद्या शिथिलता मिळेल, या अपेक्षेवर असलेल्या या व्यावसायिकांची जिल्हा प्रशासन, पोलीस आयुक्तालय आणि काही वेळा महापालिका यांच्या असमन्वयाचा आणि वेगवेगळ्या वेळी वापरल्या जाणाºया कायदेशीर अधिकाराचा फटका बसला आहे. ३ मे रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा याच निर्णयाचे सर्वाधिकार दिले असताना आणि मुख्य सचिवांनी आदेश दिल्यानंतरदेखील जो गोंधळ उडायचा तो स्थानिक पातळीवर उडालाच.रविवारी (दि.३) रात्री उशिरा जिल्हाधिकाऱ्यांनी दुकाने खुली करण्याची मुभा देणारे आदेश जारी केले. तथापि, त्याच रात्री पोलीस आयुक्तांनी संचारबंदीचे आदेश काढले. सोमवारी (दि. ४) जिल्हाधिकाºयांचे आदेश प्रमाण मानून दुकाने आणि अन्य आस्थापना उघडणाºयांचा मात्र पोलीस यंत्रणेकडून हिरमोड झाला. कारण अनेक भागात पोलिसांनी दुकानदारांकडे दुकान सुरू करण्याची परवानगी आहे काय अशी विचारणा करीत थेट दुकानेच बंद करण्यास सांगितल्याने आदेशाचे पालन करावे लागले. शहरातील मेनरोड, शिवाजीरोड आणि मेनरोडच नव्हे तर कॉलेजरोड, सिडको आणि सातपूर अशा सर्वच ठिकाणी व्यावसायिकांना कटू अनुभव आले.या सर्व घोळामुळे व्यापारी आणि व्यावसायिकांनी ओरड केल्यानंतर मंगळवारी (दि.५) जिल्हाधिकाºयांनी पुन्हा स्पष्टीकरण दिले आणि रेड झोन असतानाही शहरातील सर्व दुकाने उघडता येतील, असे स्पष्टीकरण दिले. इतकेच नव्हे तर पूर्वी एकाच लेनमधील केवळ पाच दुकाने सुरू करण्याचा आदेश रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे दुकानदारांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. मात्र, पोलीस यंत्रणेने त्यावर पाणी फेरले.---------------एका रांगेतील पाच दुकाने उघडायची?जिल्हाधिकाºयांनी यापूर्वी काढलेल्या आदेशात एकाच रांगेत अनेक दुकाने असतील तर त्यातील पाच दुकाने सुरू करता येतील, असे सांगण्यात आले. मात्र, एकाच रांगेतील पाच कोणती दुकाने सुरू करायची याचे निकष कोण ठरविणार? समजा एकाच रांगेत समान व्यावसायिक असतील म्हणजेच कापडाची दुकाने असतील तर त्यांच्यात झुकते माप कोणाला मिळणार, असाही संभ्रम होता. जिल्हा प्रशासनाने ही अट रद्द केल्याचे सांगितले खरे प्रत्यक्षात अट कायम असल्याचे पोलीस यंत्रणेचे म्हणणे होते. त्यामुळे बुधवारी (दि.६) याच कारणावरून पोलिसांनी शिवाजीरोड, महात्मा गांधी रोडवरील दुकाने बंद केली.
शहरात सुरू झालेली दुकाने पोलिसांनी लागलीच केली बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2020 10:47 PM