नाशिक : नाशिक जिल्हा बार असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा अल्प उपस्थितीत पार पडली. या ऑनलाईन सभेत मागील सभेचे इतिवृत्त वाचून त्यास मंजुरी देण्यासोबतच मागील वर्षाच्या आर्थिक ताळेबंदास तसेच आगामी वर्षाच्या अंदाजपत्रकास मान्यता देण्यात आली.
नाशिक जिल्हा बार असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवारी (दि. १२) ॲड. नितीन ठाकरे यांच्या अध्यक्षतेत खेळीमेळीत पार पडली. यापूर्वी ४ मार्चला मनुष्यबळ विकास व संशोधन केंद्रात होणार होती. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ४ मार्चची पूर्वनियोजित सभा रद्द करून ती ऑनलाईन पद्धतीने घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या सभेसाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून सभासदांना ऑनलाईन बैठकीची लिंक उपलब्ध करून देण्यात आली होती. मात्र या ऑनलाईन सभेला केवळ ३० ते ३५ सभासदांची उपस्थिती होती. तर काही सभासदांनी थोडा वेळासाठी बैठकीत उपस्थिती नोंदवून पुन्हा बाहेर पडले. त्यामुळे बार असोसिएशनची सभा अल्प उपस्थितीतच घ्यावी लागल्याचे संघटनेचे सचिव ॲड. जालिंदर तागडे यांनी दिली. सूत्रसंचालन कमलेश पाळेकर यांनी केले. सहसचिव संजय गिते यांनी आभार मानले. यावेळी ॲड, अविनाश भिडे, ॲड. तानाजी जायभावे, ॲड. शरद गायधनी, महेश लोहिते आदी सभासद व पदाधिकाऱ्यांनी सभेत सहभाग नोंदवला.