जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात शेतीमालाचे लिलाव बंद झालेले असले तरी थेट व्यापारी वर्गाच्या खळ्यावर कांदा विक्रीस न्यावा असे लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सुवर्णा जगताप व सचिव नरेंद्र वाढवणे यांनी आवाहन केले होते. त्यास लासलगाव येथील मुख्य बाजार आवारावर तसेच विंचुर व निफाड उपआवारावर अल्प प्रतिसाद मिळाला. लासलगावी ८०.२५ क्विंटल कांद्याचे लिलाव झाले. त्यास जास्तीत जास्त १२५० रुपये तर सरासरी १२०० रूपये भाव मिळाला. निफाड व विंचूर येथील उपआवारावर देखील अल्प प्रतिसाद मिळाला. दरम्यान, खळ्यावरील लिलाव प्रक्रियेस शुक्रवारी अधिक चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. लासलगाव येथील मुख्य बाजार आवारात भाजीपाल्याची देखील विक्री झाली. यावेळी फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करीत कामकाज करण्यात आल्याची माहिती सचिव वाढवणे यांनी दिली .
व्यापारी वर्गाच्या खळ्यावर कांदा विक्रीस अल्प प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 4:15 AM