नाशिक : उत्पादन शुल्क विभागाने बिअरच्या उत्पादन शुल्कात वाढ केल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून बिअरचे उत्पादन कंपन्यांनी कमी केले आहे. त्याचा फटका विक्रेते आणि ग्राहकांनादेखील बसत असून, बाजारात बिअरचा तुटवडा निर्माण झाला आहे. ऐन उत्सवाच्या काळात बिअरचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे अनेकांचा हिरमोड झाला आहे. त्यातच सौम्य तसेच मायक्रोबिअरच्या निर्मितीलाच कराचा फटका बसल्याने हौस म्हणून किंवा सेलिब्रेशन म्हणून सौम्य बिअर पिणाºयांना यंदा त्यांची मनपसंत बिअर मिळणे कठीण होणार आहे. बाजारात सध्या सौम्य बिअर उपलब्ध नसल्याने त्यांची अडचण होणार आहे. त्यामुळे हौशी तरुण-तरुणींना स्ट्रॉँग बिअरची आॅफर करणाºयांपासून सावध रहावे लागणार आहे. उत्पादन शुल्क विभागाने लादलेल्या करामुळे महिनाभरापासून बिअर कंपन्यांनी उत्पादन कमी केले आहे. त्याची अडचण फारशी समोर आलेली नव्हती, मात्र आता नाताळ आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर बाजारात बिअरला मागणी वाढल्यानंतर तुटवड्याचा परिणाम समोर आला आहे. बिअर शॉप, हॉटेल्समध्ये बिअर मिळणे मुश्कील असून, काही ठराविक एक-दोन ब्रॅन्ड वगळता अन्य बिअर मिळत नसल्याचे अनेकांनी सांगितले. हॉटेल व्यावसायिकांना प्रतीक्षा नववर्षाच्या पार्श्वभूमीवर बिअरची उपलब्धता होईल, असा अंदाज वर्तविला जात असताना या दिवसातही बिअरचा पुरेसा पुरवठा होणार नसल्याचे शहरातील काही हॉटेल्स संचालकांचे म्हणणे आहे. उत्पादन शुल्क कराच्या अटींमुळे बिअर कंपन्यांनी सौम्य बिअरची निर्मिती कमी केली आहे. त्यामुळे नामवंत कंपन्यांनी बिअर उत्पादनात कपात केल्यामुळे यंदाच्या नववर्षात अनेकांचा हिरमोड होणार आहे.
नववर्षाच्या उत्सवात बिअरची टंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 1:07 AM